जेधे चौक, डेक्कन, विद्यापीठ चौक, नळ स्टॉप, इंजिनिअरिंग कॉलेज, कात्रज आणि हडपसर गाडीतळ अशा काही प्रमुख चौकांमध्ये वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामोरे जावे लागत असून, ही कोंडी कधी फोडणार, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
विद्यापीठ चौकातही औंध, बाणेर आणि पाषाण रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना बराच वेळ थांबावे लागते. तेथील सिग्नलच्या वेळेत बदल आणि सुसूत्रीकरण करण्यात आलेले नाही. चांदणी चौकात कोथरूड येथून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना सर्व्हिस रस्ताच नाही. तशीच स्थिती कात्रज परिसरात आंबेगाव पठार येथील रहिवाशांची आहे. तेथील नागरिकांना सर्व्हिस रस्ताच नसल्यामुळे महामार्गावर विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
बैठकीला मुहूर्त कधी?
वाहतूक शाखेने शहरातील विविध चौकांतील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी “व्हिजन डॉक्युमेंट‘ सादर केले. त्यासाठी महापालिका, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि संबंधित घटकांनी महापालिकेत एकत्रित बैठक बोलावून समन्वयाने मार्ग काढण्याचे ठरले होते. मात्र, या बैठकीला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.
शहरातील प्रमुख चौकांमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठ व डेक्कन बस स्थानक चौकातील स्थितीचे सर्वेक्षण केले आहे. तेथील प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल. सातारा रस्त्यावरील पुष्पमंगल चौकातील पादचारी आणि दुचाकी वाहनांसाठी बांधलेला भुयारी मार्ग शुक्रवार (ता. 1 मे)पासून सुरू करण्यात येणार आहे, तसेच मुंबई-पुणे जुन्या मार्गावरील बोपोडी चौकात सिग्नल बसविण्यात आला आहे.
– सारंग आवाड, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा
