पुणे – वेळ : गर्दीची…
स्थळ : शहरातील कुठलाही पेट्रोल पंप… 
तुम्ही तुमच्या दुचाकी अथवा चारचाकीसह रांगेत उभे असता… थोड्या वेळाने तुमचा “टर्न‘ आल्यानंतर तुम्ही पंपावरील कर्मचाऱ्याला पाचशे रुपयांचे इंधन भरण्यास सांगता… कार्मचारी इंधन भरण्यास सुरवात करतो आणि मीटरवरील आकडा “100‘ पर्यंत आला की थांबतो. तुम्ही त्याला चूक लक्षात आणून देता आणि सांगता की पाचशे रुपयांचे पेट्रोल भरावयास सांगितले होते. मग “तो‘ पुन्हा इंधन भरायला सुरवात करतो आणि हातचलाखीने “100‘ आकड्याच्यापुढचे पुन्हा मीटरचे रीडिंग सुरू करतो. मीटरवर “400‘ रीडिंग दिसताच तो थांबतो आणि पूर्वीचे “शंभर‘ आणि आता मीटरवर दिसणारे “चारशे‘ असा पाचशे रुपयांचा “हिशेब‘ तुम्हाला ऐकवतो. तुम्हीही घाईगडबडीत पैसे देऊन निघून जाता. 
सध्या शहरातील बहुतेक सर्व भागातील पेट्रोल पंपावर कमी-अधिक प्रमाणात हे व तत्सम फसवणुकीचे प्रकार सर्रास पाहायला मिळत आहेत. हडपसर, मांजरी रस्ता, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, स्वारगेट आदी भागातील नागरिकांनी याबाबत “सकाळ‘कडे तक्रारी केल्या. चारचाकीमध्ये इंधन भरताना असे प्रकार प्रामुख्याने उघडकीस आले आहेत. इंधन भरताना बहुतेकदा चालक गाडीतून खाली उतरत नाहीत, अशा वेळी मीटरकडे लक्ष न दिल्यास फसवणुकीची शक्‍यता वाढते. विशेषतः घाईगडबडीत असणाऱ्या नोकरदार वर्गाला अशा प्रकारांत “लक्ष्य‘ केले जाते. दुचाकीस्वारांनाही बोलण्यात गुंतवून हातचलाखी केली जाते. खासगी कंपनीत नोकरी करणारा संदीप पाटील म्हणाला, “”जेधे चौकातील पेट्रोल पंपावर मला फसवणुकीचा अनुभव आला. मीटरवरील पूर्वीचे “रीडिंग‘ तसेच ठेवून मला बोलण्यात गुंतवून पंपावरील कर्मचाऱ्याने इंधन भरले. मला शंका आल्याने मी त्याला हटकले. शेवटी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर तो वरमला व उरलेले इंधन भरले.‘‘ 
चालकांनी पुढील सावधानता बाळगावी – 
– पेट्रोल भरण्यापूर्वी सर्वप्रथम मीटरवरील “शून्य‘ रीडिंग तपासा. तपासताना जर कोणी बोलण्यात गुंतविण्याचा प्रयत्न केला तर दुर्लक्ष करा. 
– चारचाकीचालकांनी विशेष काळजी घ्यावी. गाडीत बसून इंधन भरणे टाळावे, पेट्रोल भरणाऱ्या यंत्राच्या मीटरकडे कटाक्षाने लक्ष ठेवावे. 
– तुम्ही सांगितलेल्या पैशांपेक्षा कमी “रीडिंग‘वर मीटर थांबवले गेले, तर इंधन भरणाऱ्याला सर्वप्रथम मीटरचे रीडिंग “शून्य‘ करण्यास सांगा व मगच पुढचे इंधन भरा. 
– फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित पंप व्यवस्थापकाला हा प्रकार लक्षात आणून द्या. 
पेट्रोल भरणाऱ्या यंत्रामध्ये फेरफार करता येत नाही म्हणून कामगारांनी हा फसवणुकीचा नवीन प्रकार अवलंबिला आहे. अशा प्रकारांमध्ये पंपमालकाचा व पंप व्यवस्थापकाचा कुठल्याही प्रकारे संबंध नसतो. त्यामुळे व्यवहाराबाबत शंका आल्यास नागरिकांनी त्वरित पंप व्यवस्थापकाकडे तक्रार करावी. दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– अली दारूवाला, प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन.

स्त्रोत : सकाळ

full_13424_1427646514202847_1257291623752179165_n