खंडेरायाच्या जेजुरी नगरीची आजपर्यंत तीर्थक्षेत्र म्हणून ओळख होती, परंतु आता लवकरच पर्यटन स्थळ म्हणूनही नवी ओळख प्राप्त होणार आहे. गडाच्या परिसरातील २३ हेक्टर क्षेत्रामध्ये वनखात्याने मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड व सुशोभीकरणाचे काम हाती घेतल्याने हा सारा परिसर गर्द हिरवाईने नटणार आहे.
जेजुरीला वर्षांकाठी सात मोठय़ा यात्रा भरतात. यात्रेसाठी लाखो भाविक येतात, एरवीही मोठी गर्दी असते. जय मल्हार मालिकेमुळे गर्दीत चौपट वाढ झाली आहे. गेल्या वर्षी तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते पाच कोटींच्या कामाला सुरुवात करण्यात आली13jajuri1 होती. या प्रकल्पांतर्गत २० हजार वृक्षांची लागवड करणे, बालोद्यानाची निर्मिती, भाविकांना बसण्यासाठी झाडाभोवती ओटे,पॅगोडा, निसर्ग अभ्यास केंद्र उभारणे, भाविकांना निसर्ग परिक्रमा करण्यासाठी पथ, वन्य प्राण्यांसाठी पाणवठे आदी कामे होणार आहेत. हे काम युद्ध पातळीवर सुरू असून सध्या खंडोबा गडाच्या परिसरात एक मीटर उंचीची सहा हजार झाडे लावण्यात आलेली आहेत. या झाडांना पाणी देण्यासाठी सुरुवातीला टँकरचा वापर केला जात होता, परंतु सर्व ठिकाणी पाणी पोहोचावे यासाठी पेशवे तलावातून थेट पाईपलाईन डोंगरात नेऊन तेथील पाण्याच्या टाकीत पाणी साठवण्यात आले आहे. येथूनच सर्व झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केली जात आहे.
उद्यानतज्ज्ञ सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे वड, पिंपळ, उंबर, चिंच, कवट, लिंब, गुलामोहर, आपटा, कांचन, बांबू आदी वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. वन खात्याने दोन ठिकाणी आकर्षक पॅगोडे उभे केल्याने या ठिकाणी विश्रांतीसाठी भाविक व निसर्गप्रेमी आवर्जुन येत आहेत. रमणा ते खंडोबा गड, कडेपठार पायथा ते खंडोबा गड असे दोन कच्चे रस्ते वन खात्याने तयार केले असून यामुळे प्रत्येक झाडापर्यंत पाणी देणे सोपे होत आहे. डोंगरातील परिसरात असलेल्या अनेक जुन्या झाडांना पार बांधण्यात आले असून या ठिकाणी भाविकांना हक्काची सावली मिळाली आहे. डोंगरातील उतारावर पाणी अडवण्यासाठी शंभरावर दगडी बंधारे बांधल्याने येणाऱ्या पावसाळ्यात तेथे पाणी साठणार आहे. या परिसरात हरीण, कोल्हा, लांडगा, चिंकारा, तरस, ससे, रान डुक्कर, सायाळ, खोकड, रानमांजर, खार आदी प्राणी मोठय़ा प्रमाणात आहेत. याशिवाय मोर, लांडोर, घुबड, घार, पोपट, बहिरी ससाणा आदी पक्ष्यांचाही वावर असतो. यांना पाणी पिण्यासाठी बशीच्या आकाराचे पाच सिमेंटचे पाणवठे बांधण्यात येणार आहेत.
खंडोबा गडाच्या जवळ बालोद्यान उभारण्याचे काम सुरू असून तेथे लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी बसविणार आहेत, तर पक्षी व प्राण्यांची माहिती, निसर्गसंवर्धन या विषयी मार्गदर्शनपर फलक व प्रतिकृती उभारणार असल्याची माहिती सासवड विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी बाळासाहेब दोरगे यांनी दिली.
नुकतेच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही जेजुरीच्या विकासासाठी पाच कोटी निधी देण्याची घोषणा केलेली आहे. यातून विकासाला हातभार लागणार आहे. खंडोबा गडावरून दीड किलोमीटर अंतरावर खंडोबा देवाचे मूळ स्थान कडेपठार मंदिर आहे. येथेही भाविकांची मोठी गर्दी असते. कडेपठार व खंडोबा गड परिसर पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावा, अशी अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी आहे. पूर्वी हा सारा परिसर निसर्गाने समृद्ध होता, परंतु बेसुमार वृक्षतोड व डोंगराला वारंवार लागणारे वणवे यामुळे येथील वनराईला ग्रहण लागले, परंतु आता वन खात्याने या परिसराचा कायापालट करायचाच असा निर्धार करून काम हाती घेतल्याने निश्चितपणे लवकरच दाट वनराईत रूपांतर होणार असल्याने भाविकांना देवदर्शनाबरोबरच वनपर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.
स्त्रोत : लोकसत्ता