icare4pune

शहराचे पूर्व प्रवेशद्वार होणार चकाचक

हडपसर – शहराचे पूर्व प्रवेशद्वार स्वच्छ व सुंदर आणि वाहतूक कोंडीमुक्त केले जाईल, अशी ग्वाही महापौर प्रशांत जगताप यांनी “महापौर आपल्या दारी‘ या अभियानावेळी नागरिकांना दिली.

सोलापूर रस्त्यावरील सायकल ट्रॅक, पदपथ आणि पुलाखालील सर्व जागा अतिक्रमणमुक्त केल्या जातील. त्या ठिकाणी उद्यान व सुशोभीकरण केले जाईल. मांजरी फाट्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या चौकात ग्रेडसेपरेटर करणे व रविदर्शन ते लक्ष्मी कॉलनीपर्यंतचा रस्ता पालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी नॅशनल ऍथॉरिटीसोबत पाठपुरावा सुरू आहे. रस्ता ताब्यात आल्यानंतर नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक कोडी सोडविण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जातील. यासाठी सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांना विश्वासात घेतले जाईल, असेही महापौरांनी सांगितले.

या प्रसंगी नगरसेविका वैशाली बनकर, रंजना पवार, विजया कापरे, विजया वाडकर, फारूख इनामदार, स्वीकृत सदस्य शिवाजीराजे भोसले, सहायक महापालिका आयुक्त सुनील गायकवाड, वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील शेळके, माजी नगरसेवक शिवाजी पवार, सुनील बनकर उपस्थित होते.

महापौरांपुढे नागरिकांनी कचरा, पाणी, ड्रेनेज, सार्वजनिक स्वच्छतागृह आदीबांबत आपल्या तक्रारी मांडल्या. या वेळी दुगडचाळ ते जेएसपीएमएस रस्त्याचा प्रश्न सोडविणे, गांधी चौकातील पुलाखालील महिला स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवणे, पीएमपी आगारात स्वच्छतागृह बांधणे, नवनाथ चौकात व मांजरी फाटा चौकात सिग्नल बसविणे या तक्रारी तातडीने मार्गी लावण्याची सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बीआरटी मार्गावरील सायकल ट्रॅक व पदपथामुळे रस्ते लहान झाल्याने ते काढून टाकावेत, अशी सूचना नागरिकांनी केली. मात्र या योजनेला केंद्राकडून अनुदान आले असून, बीआरटीसाठी निधी देताना सायकल ट्रॅक व पदपथ बांधण्याच्या अटीवर निधी मिळाला आहे. त्यामुळे ते काढता येणार नाहीत. मात्र या दोन्ही मार्गांवर अतिक्रमण होणार नाही, याची यापुढे काळजी घेतली जाईल, असे महापौरांनी नमूद केले. बेशिस्त रिक्षा, अवैध प्रवासी वाहतूक याबाबतदेखील नागरिकांनी तक्रारी मांडल्या.

सर्वपक्षीयांच्या मदतीची गरज
महापौर म्हणाले, ‘सप्टेंबर महिनाअखेर ससाणेनगर-सय्यदनगर रेल्वे फाटकावरील रखडलेल्या ग्रेडसेपरेटरचे काम सुरू होईल. सुमारे शंभर मिळकतींच्या मालकांच्या जागा ताब्यात येणे बाकी आहे. त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सर्व मिळकतीच्या मालकांशी चर्चा करणार आहे. फाटकावर ग्रेडसेपरेटर टाकून येथील वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे सर्व नागरिक व राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून या कामासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.‘‘

स्त्रोत : सकाळ

Scroll to Top