रमजान ईदनिमित्त शहरातील काही भागांत गुरुवारी (ता. 7) वाहतुकीत बदल करण्यात आले असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.
ईदनिमित्त मुस्लिम धार्मीय नागरिक मशीद आणि ईदगाह मैदानावर नमाज पठण करतात. त्या वेळी ईदगाह मैदान परिसरात वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी या व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर सकाळी सहा वाजता नमाज पठण होणार आहे. नमाज पठण होईपर्यंत मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक आणि तेथून सेव्हन लव्हज चौकादरम्यानची वाहतूक सर्व वाहनांसाठी आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार आहे.
या पर्यायी मार्गाचा वापर करावा
1) मम्मादेवी चौकापासून गोळीबार मैदान चौक ते सेव्हन लव्हज चौकाकडे येताना भैरोबानाला-लुल्लानगर चौक -गंगाधाम चौक- वखार महामंडळ- गिरिधर भवन चौक- सेव्हन लव्हज चौक.
2) सेव्हन लव्हज चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी सेव्हन लव्हज चौक- गिरिधर भवन चौक- वखार महामंडळ- गंगाधाम चौक- लुल्लानगर चौकमार्गे किंवा डायस प्लॉटमार्गे गिरिधर भवन चौकातून सॅलिसबरी पार्कमार्गे, सरळ सोलापूर बाजार पोलिस चौकातून उजवीकडे वळून, शंकरशेठ रस्त्याने मम्मादेवी चौकमार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
इतर भागांतील वाहतुकीत बदल
शहरातील खडकी बाजार, रेंजहिल्स, एच. टाइप मैदान, खडकी, चऱ्होलीगाव, चिंचवडगाव, गव्हाणे वस्ती, भोसरी, वेल्फेअर दारूल कमिटी, भोसरी, हंडेवाडी रस्ता, हडपसर, घोरपडी बाजार मैदान, डायमंड कंपनी व मुंढवा येथील वाहतूक परिस्थितीनुसार बंद अथवा अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
— सकाळ वृत्तसेवा