पावसाळा सुरू झाला, की जशी आरोग्याची काळजी घेतली जाते, तशीच काळजी वाहनांच्या आरोग्याची घेणे आवश्यक आहे. दुचाकी असो वा चारचाकी पावसाळ्यात वाहने चिखलाने माखून जातात. बऱ्याचदा ऐन प्रवासात तक्रारीला सामोरे जावे लागते; पण योग्य ती खबरदारी घेतली, की वाहने सुस्थितीत राहतात आणि दीर्घकाळ टिकतात. पावसाळ्यात वाहनांची काय काळजी घ्यावी, याविषयी वाहन दुरुस्ती व्यवसाय करणाऱ्यांनी दिलेल्या टिप्सद्वारे आपल्या वाहनांचे आरोग्य जपायला हरकत नाही.
1) चारचाकी
सर्वांत प्रथम वाहनांची दर्शनी काच आणि काच स्वच्छ करणारा वायपर सुस्थितीत हवा. त्यासाठी काचेवर फवारा मारणाऱ्या स्प्रेमध्ये पाणी आणि शाम्पू (स्क्रीन वॉश) घालावे. टायरबरोबरच ब्रेक सिस्टिम सुस्थितीत असायला हवी. मागच्या टायरचे ब्रेक लायनिंग चांगले असणे आवश्यक आहे. गंज लागू नये याची काळजी घ्यायला हवी. नवीन गाडी घेतानाच अंडर कोटिंग, इंजिन कोटिंग करून दिले जाते. बॉडी गंजू नये म्हणून टेफ्लॉन कोटिंग चांगले ठरू शकते. टेफ्लॉन कोटिंग करून घेतल्याने बॉडीवर पाणी राहत नाही. पावसाळ्यात एकाच जागी वाहन थांबून राहणार असेल तर ते गॅरेजमध्ये ठेवावे. अधूनमधून वाहन सुरू करून बॅटरी सुस्थितीत आहे का, याची खात्री करावी.
2) दुचाकी
पावसाचे पाणी प्लगमध्ये जाऊ नये यासाठी गाडी शक्यतो मधल्या स्टॅंडवर लावावी. आवश्यक त्या ठिकाणी वेळोवेळी ऑइल घालावे. पावसामुळे चेन ड्राय होण्याची शक्यता असते, त्यामुळे चेनला वरचेवर ऑइल घालावे. वाहनात वापरलेले ऑइल न वापरता ते नवीनच असावे. शक्यतो दोन्ही ब्रेक योग्य पद्धतीने ऍडजेस्ट करून घ्यावेत. आठवड्यातून एकदा तरी दुचाकी धुणे आवश्यक आहे. ब्लॉकपिस्टन, कार्बोरेटरवर चिखल उडून गंज धरण्याची शक्यता आहे. टायरच्या रिमला गंज धरू नये म्हणून बाजारात मिळणारे केमिकल वापरावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गाडीचे इलेक्ट्रिक पार्ट चांगले राहायला हवेत. पार्टबद्दल थोडी जरी शंका असेल तर बदलून घेणेच योग्य.
“पंधरा दिवसाला ऑइल, ग्रीसिंग करावे‘
वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करणारे दिनेश विश्वकर्मा म्हणाले, “”पावसाळ्यात दर 15 दिवसांनी वाहन स्वच्छ धुऊन त्याला ऑइल, ग्रीसिंग करावे, त्यामुळे गंजण्यापासूनही वाहनाचे रक्षण होते. ब्रेकचे सेटिंगही योग्य प्रमाणात करून घ्यावे. लायनर खराब झाले असल्यास नवीनच टाकावे. घासून गुळगुळीत झालेले टायर पावसाळ्यात थोड्या ओल्या रस्त्यावर वा चिखलात घसरू शकतात. टायरची अवस्था बिघडली असल्यास बदलणेच उत्तम.‘‘
अशी घ्या दक्षता
– दोन्ही ब्रेक तपासूनच वेग वाढवा.
– दिवे लागत असल्याची खात्री करा.
– गुळगुळीत झालेले टायर बदला.
– मडगार्डचा वापर करावा.
– काचेवर बाष्प धरू नये यासाठी एसी सुरू ठेवावा.
– पाण्याच्या धारेखाली वाहन उभे करू नका.
– साचलेल्या पाण्यातून वाहन नेऊ नका.