icare4pune

राज्यात अद्याप दमदार मॉन्सूनची प्रतीक्षा

दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होऊन दोन दिवस झाले तरीही अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कोकण आणि महाबळेश्‍वर वगळता उर्वरित राज्यात पावसाची नोंद झाली नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पुढील चोवीस तासांमध्ये कोकणात बहुतांश ठिकाणी; मराठवाडा, विदर्भात बऱ्याच ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही भागातच पाऊस पडेल, असा अंदाजही खात्याने वर्तविला आहे.

मॉन्सूनने संपूर्ण राज्य व्यापले आहे; पण सलग दोन वर्षे दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे जूनचा शेवटचा आठवडा तोंडावर आला असतानाही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेले दोन दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाळी वातावरण होते; पण त्यानंतर बुधवारी दिवसभर कडकडीत ऊन पडले.

पावसाची प्रतीक्षा कायम
मॉन्सूनने राज्य व्यापले असले तरीही प्रत्यक्षात पाऊस पडत नाही. सध्या राज्यात मॉन्सूनच्या पावसास पोषक वातावरण नाही. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. पण, त्याची तीव्रता नसल्याने राज्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. पुढील तीन- चार दिवसांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यातून पुढील काही दिवसांमध्ये राज्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

तापमान वाढले
राज्यातील सर्व प्रमुख शहरांचे कमाल तापमान सरासरीपेक्षा वाढले आहे. गेले दोन दिवस बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावल्याने किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा घसरला. राज्यात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे 40.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांमधील तापमानात चार ते पाच अंश सेल्सिअसची वाढ झाल्याची माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

पुण्यात कडक ऊन
पुण्यात सकाळपासून कडक ऊन होते. गेल्या दोन दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आज निवळले होते. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला. कमाल तापमान 3.4 अंश सेल्सिअसने वाढून 33.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील चोवीस तासांमध्ये पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

देवगडमध्ये 252 मिलिमीटर पाऊस
दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस पडला. बुधवारी (ता. 22) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये देवगड येथे 252 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.

कोकणात जोर वाढणार
पश्‍चिम किनारपट्टीलगत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा बुधवारी उत्तर मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत विस्तारला होता. आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती पोषक असल्याने कोकणासह पश्‍चिम किनाऱ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे, तर उर्वरित महाराष्ट्रातही पावसाला सुरवात होणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

मॉन्सूनची प्रगती
मॉन्सूनने अरबी समुद्रावरून आणखी प्रगती करत बुधवारी दक्षिण गुजरातच्या वेरावळ, सुरतपर्यंत प्रगती केली आहे. देशाचा वायव्य भाग वगळता बहुतांशी भागांत मॉन्सून दाखल झाला आहे. वायव्य भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना राज्यांत, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांत अद्याप मॉन्सून पोचलेला नाही. कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टीवर मॉन्सून सक्रिय झाला आहे.
– – सकाळ वृत्तसेवा

Scroll to Top