गोव्याच्या उंबरठ्यावर गेल्या चार दिवसांपासून मुक्काम असलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचा (मॉन्सून) पुढील प्रवास सुरू होणार आहे. येत्या रविवापर्यंत (ता. 19) मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होईल, अशी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
मॉन्सूनने शुक्रवारी कर्नाटकच्या संपूर्ण किनारपट्टीवर दमदार हजेरी लावली. तेथे पावसाच्या जोरदार सरी पडल्या. त्याच वेळी आंध्र प्रदेशाचा काही भागी त्याने व्यापला. मात्र, मॉन्सूनची पुढे वाटचाल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे कर्नाटकातील कारवारपर्यंत आणि गोव्याच्या उंबरठ्यावर मॉन्सूनने गेले चार दिवस मुक्काम ठोकला होता. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मॉन्सूनच्या अरबी समुद्रातील शाखेचा पुढे प्रवास सुरू होईल, असा विश्वास हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गेली दोन वर्षे दुष्काळाने होरपळलेल्या आणि पावसाची आतुरतेने पाहात असलेल्या मराठवाड्याच्या काही भागांत, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सून हजेरी लावेल.
बिहारपासून बंगालच्या उपसागरापर्यंत असलेल्या हवेच्या कमी दाबपट्ट्यामुळे बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनची वेगाने वाटचाल सुरू आहे. बंगालच्या उपसागरावरून ईशान्य भारताच्या दिशेने प्रवास करणाऱ्या मॉन्सूनच्या शाखेने मंगळवारी आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशासह पश्चिम बंगालचा हिमालय पर्वताकडील भाग आणि सिक्कीमच्या काही भागांपर्यंत मजल मारली.
बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. या स्थितीच्या प्रभावामुळे रविवारपर्यंत संपूर्ण गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्य, तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारमध्येही मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
– – सकाळ वृत्तसेवा