‘जीपीएस‘ यंत्रणा न बसविलेल्या टॅंकरला पर्वती जल केंद्रावर पाणी भरण्यास प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. टॅंकरचा काळाबाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्टपासून “जीपीएस‘ यंत्रणा न बसविलेल्या टॅंकरला अन्य सर्व केंद्रांवर पाणी भरू दिले जाणार नसल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.
शहरातील सर्व भागांना समान पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे काही भागांत महापालिकेकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महापालिकेचे सुमारे 15 टॅंकर असून, खासगी टॅंकरची संख्या सुमारे 200 आहे. परंतु काही टॅंकर हे अपेक्षित ठिकाणी पाणीपुरवठा न करता महापालिकेच्या हद्दीबाहेर जाऊन पाण्याची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्व टॅंकरना “जीपीएस‘ यंत्रणा बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार आतापर्यंत सुमारे 90 टक्के टॅंकरला ही यंत्रणा बसविल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. सुरवातीला अशी यंत्रणा बसविण्यास खासगी टॅंकर लॉबीने विरोध केला होता. परंतु प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्यामुळे पुढील महिन्यापासून सर्वच टॅंकरना जीपीएस यंत्रणा बसविणे भाग पडणार आहे. या निर्णयामुळे प्रत्येक टॅंकरवर “लक्ष्य‘ ठेवता येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
स्त्रोत : सकाळ