icare4pune

पदपथावर रिक्षा, हातगाड्यांचे ‘थांबे’; पादचाऱ्यांसह वाहनचालकांची कसरत

तिन्ही बाजूंनी जेधे चौकाच्या दिशेने येणारी वाहने… त्यांच्यामधून जीव मुठीत धरून रस्ता ओलांडणारे पादचारी… उड्डाणपुलासाठी बांधलेल्या खांबाना चुकवीत त्यातून मार्ग काढीत पुढे निघालेल्या पीएमपीच्या गाड्या… अन्‌ रस्त्यातच पीएमपीशी स्पर्धा करीत प्रवाशांना बोलावत रिक्षासह थांबलेले रिक्षाचालक. स्वारगेटची ही रोजची स्थिती. सर्वांच्याच सवयीची झालेली.

जेधे चौकातून सातारा रस्त्याकडे जाताना तर सर्वांचाच जीव घाबराघुबरा होतो. कारण बीआरटी मार्गाने ये-जा करणाऱ्या गाड्या. बीआरटी मार्गालगतच्या बसस्थानकाजवळील रस्त्याने जाण्याऐवजी काही वाहनचालक त्यांची वाहने बीआरटी मार्गातच घुसवितात. त्यामुळे, बसथांब्यालगत पीएमपी गाडी थांबल्यानंतर, कडेच्या जागेतून पुढे जाणारी वाहने आणि त्यांच्यामधून बसकडे जाणारे प्रवासी यांची कसरत सुरू असल्याचे दिसते. बीआरटी लगतच्या रस्त्याने जाणाऱ्या वाहनांची कोंडी होते, ती स्वारगेट एसटी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी. बसस्थानकात एसटी गाड्या प्रवेश करीत असतात. मात्र त्यांचा मार्ग अडवून अनेक रिक्षा थांबलेल्या. तीच स्थिती स्थानकातून एसटी गाडी बाहेर पडत असतानाची. तेथेही आठ-दहा रिक्षा कायमच्या उभ्या. तेथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने, एसटी बस बाहेर पडली, की तिला वळतानाच पुलाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या पत्र्याला चुकवावे लागते. त्यामधून वाट काढू पाहणाऱ्या दुचाकी वाहनचालकांवरही त्या बसचालकाला लक्ष द्यावे लागते. तेथून सुटका झाल्यावर वाहनचालकांना कालव्यापासून अपुऱ्या जागेतून मार्गस्थ व्हावे लागते. तेथे महापालिकेने नीट रस्ताही केलेला नाही. त्यामुळे खड्डे चुकवीत वाहने हळूहळू पुढे जातात. जेधे चौकापासून ते लक्ष्मीनारायण चित्रपटगृहापर्यंत दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे आहेत, रस्ताही समतल नाही. सुमारे दोन वर्षे काम सुरू असेल, तर तेथील कडेचे रस्ते महापालिकेने चांगले बनविण्याची आवश्‍यकता आहे.

पादचाऱ्यांची नाराजी
पादचाऱ्यांसाठी तर येथे सिग्नलच नाही. त्यांच्या अडचणीकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते. एसटी बसस्थानकासमोर असलेल्या झेब्रा क्रॉसिंगला तर कोणी वाहनचालक जुमानत नाही. त्यामुळे बॅगा, पिशव्या सांभाळत प्रवासी रस्ता ओलांडत असल्याचे दिसून येते. काही पादचाऱ्यांशी संवाद साधल्यावर, त्यांची या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. वाहतूक पोलिस काहीच करीत नसल्याबद्दल काही जणांनी टीका केली.
कारवाईऐवजी कोंडी कमी करा 
उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असताना, त्या परिसरातील वाहतूक सुरळित ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस यंत्रणेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे तेथे केलेल्या पाहणीत आढळले. विशेषतः एसटी बसस्थानकाजवळ थांबलेल्या रिक्षांवर पोलिसांनी कारवाई करण्याची अपेक्षा आहे. तेथे वाहतुकीची कोंडी होत असताना, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. तीच स्थिती दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावरही आहे. महापालिकेची अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी दिवसभर येथे थांबते. पण सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत हातगाड्यांनी पदपथ व्यापलेला असतो. त्याकडे महापालिकेच्या यंत्रणेने दुर्लक्ष होते. वाहतूक पोलिस जेधे चौकात थांबून वाहनांवर कारवाई करताना दिसून येतात. त्याऐवजी त्यांनी वाहतुकीची कोंडी कमी करण्यावर, तसेच पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यास मदत करण्याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा या चौकात नागरिकांनी त्यांच्याशी संवाद साधल्यावर व्यक्त केली.

जेधे चौकातील वाहतूक कोंडीमुळे रस्ता ओलांडताना खूप त्रास सहन करावा लागतो. कारण पदपथच गायब आहे. गर्दीच्या वेळी अपघात होण्याची भीती वाटते. महाविद्यालयात वेळेवर पोचायचे असेल तर खूप वेळेपूर्वी घरातून बाहेर पडावे लागते.

– सुरेश आखोदारी, विद्यार्थी

स्त्रोत : सकाळ
full_3index.jpg

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top