सिंहगड रस्त्यालगतच्या उपरस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण

सिंहगड रस्ता हा पुण्यातील महत्त्वाच्या व मोठय़ा रस्त्यांमधील एक रस्ता.

सिंहगड रस्ता हा पुण्यातील महत्त्वाच्या व मोठय़ा रस्त्यांमधील एक रस्ता. हा सिंहगड रस्ता आणि वाहतूक कोंडी हे समीकरण ठरलेले आहे. या मुख्य रस्त्याला जोडून असलेल्या अंतर्गत रस्त्यांकडे जातानादेखील वाहतुकीचा बोजवारा उडालेला पाहावयास मिळतो. मुख्य रस्त्यांबरोबर उपरस्त्यांवरही नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

सिंहगड रस्त्यावरून दांडेकर पूल, हिंगणे, आनंदनगर, माणिकबाग, सनसिटी, नऱ्हे, वडगाव, धायरी, नांदेडसिटी, किरकिटवाडी आदी भागांत नागरिकांची तसेच वाहनांची ये-जा मोठय़ा प्रमाणात असते. मुख्य रस्त्यासोबत या उपरस्त्यांवर देखील गर्दी असते.

अंतर्गत भागातील रस्ते चिंचोळे असून ही गर्दी मुख्य रस्त्यावर आली की त्या त्या भागात वाहतूक कोंडी होते. सिंहगड रस्त्याला जोडून असलेले अंतर्गत रस्ते सुरुवातीला चिंचोळे आहेत आणि नंतर ते रुंद होत गेलेले पाहायला मिळतात. या चिंचोळ्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. या रस्त्याला लागून असलेल्या अंतर्गत रस्त्यांवर सोसायटय़ांच्या नावाच्या पाटय़ा लावण्यात आल्या आहेत.

परंतु दिशादर्शकांचा अभाव आहे. जागेच्या अभावी हे रस्ते रूंद करण्यासाठी कोणताही प्रयत्न करता येत नाही. सिंहगड रस्त्यावरील सनसिटीकडे जाणारा मार्ग, माणिक बाग परिसराला जोडून असणारा अंतर्गत रस्ता, हिंगणे रस्त्यावरून वडगावकडे जाणारा रस्ता अशा विविध भागातील रस्ते अरुंद असून पुढे ते रुंद होत गेले आहेत.

सिंहगड रस्ता परिसरात रिक्षा चालवतो. मुख्य रस्त्याला जोडून असणारे अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. तेथून प्रवास करताना मुख्य रस्त्यांएवढीच वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळते. या चिंचोळ्या रस्त्यावर पीएमपीची बस अथवा मोठे वाहन बंद पडले तर वाहतूक कोंडीत अडकून थांबावे लागते.

-अमोल शिंदे, रिक्षा चालक

वारजे येथून सनसिटीकडे तसेच सनसिटीमार्गे सिंहगड रस्त्यावरून मी प्रवास करते. नोकरदार आणि व्यावसायिक वर्गाची कामाला जाण्याची वेळ सकाळी साडेआठ ते दुपारी बारापर्यंत तर परतायची वेळ सायंकाळी सहा ते रात्री नऊ असते. या कालावधीत रस्त्यावर फार मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. मला वेळेत प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे खूप वेळ वाया जातो.

-सायली ममदापूरकर, अभियंता

 

सनसिटी परिसरात माझे घर आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्याअंतर्गत असलेल्या रस्त्यांवर नेहमीच प्रवास करतो. मुख्य रस्त्याकडून सनसिटीकडे येणारा रस्ता सुरुवातीला चिंचोळा आहे आणि पुढे रूंद होत गेलेला आहे. येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाद, भांडणे असे प्रकार झालेले पाहावयास मिळतात.

-संजीव ढेकणे, निवृत्त अधिकारी

विठ्ठलवाडी परिसरातील विश्रांतीनगर भागात राहाते. वडगाव परिसरात सिंहगड महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थी वर्गाची गर्दी असते. विश्रांतीनगरचा रस्ता अरुंद आहे. पुढे वडगावकडे मात्र हा रस्ता रुंद होत जातो.

-शिल्पा शहा, गृहिणी

स्त्रोत : लोकसत्ता

Advertisements