पार्किंगची मोठी समस्या

शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात दररोज दहा ते पंधरा हजार नागरिक कामकाजासाठी येतात.

न्यायालयाच्या आवारात वाहनांना जागा नाही

शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात न्यायालयीन कामकाजासाठी दररोज वकील तसेच पक्षकार मोठय़ा संख्येने येतात. न्यायालयाच्या आवारात वाहने लावण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ नसल्याने वाहने न्यायालयाच्या बाहेरील रस्त्यावर लावली जातात. त्यामुळे न्यायालयाच्या बाहेरील रस्त्यांवर वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.

शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात दररोज दहा ते पंधरा हजार नागरिक कामकाजासाठी येतात. शहर आणि जिल्हय़ातील वकील तसेच पक्षकारांचा यामध्ये समावेश आहे. न्यायालयाच्या आवारात प्राधान्याने वकिलांना वाहने लावण्यास जागा उपलब्ध करून दिली जाते. आवारातील वाहनतळात वकिलांची वाहने लावली जातात. न्यायालयीन कामकाजासाठी मोठय़ा संख्येने पक्षकार येतात.

त्यांना वाहने लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने पर्यायाने कामगार पुतळा रस्त्यालगतची जागा आणि संचेती हॉस्पिटलकडून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने लावली जातात. त्यामुळे तेथे बऱ्याचदा वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते.

वकील तसेच पक्षकार चारचाकी वाहनांमधून न्यायालयात येतात, त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर येणारी चारचाकी आणि दुचाकी वाहने लावण्यास येथे वाहनतळ उपलब्ध नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर वाहनचालकांची गैरसोय होते. रस्त्यावर बेशिस्तरीत्या लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते.

न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या पक्षकारांना वाहने लावण्यास जागा उपलब्ध नसल्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. पार्किंगची समस्या गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. न्यायालयाच्या समोर रेल्वे प्रशासनाची जागा आहे. ही जागा मिळवण्यासाठी सरकारकडून पाठपुरावा करणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासनाकडून जागा मिळाल्यास पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

कौटुंबिक न्यायालयाचे स्थलांतर न्यायालयाच्या समोरील जागेत होणार आहे. तेथेही वाहने लावण्यास जागा नाही. कौटुंबिक न्यायालयाचे स्थलांतर येथे झाल्यास वाहने लावण्यास जागादेखील उपलब्ध होणार नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

स्त्रोत : लोकसत्ता

pun216

Advertisements