स्थानिकांच्या विरोधानंतर औंधमधील ‘वॉकिंग प्लाझा’ प्रयोग गुंडाळला

ब्रेमेन चौक ते परिहार चौक या रस्त्यावर एका बाजूलाच पार्किंग करण्यात आले होते.

स्मार्ट सिटी प्रकल्पातील पहिला प्रयोग म्हणून औंध येथील ब्रेमेन चौक ते परिहार चौक दरम्यान प्रादेशिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला ‘वॉकिंग प्लाझा’ हा प्रयोग अखेर गुंडाळण्यात आला. आयुक्त कुणाल कुमार यांनीच तशी माहिती शनिवारी नागरिकांच्या बैठकीत दिली.

स्मार्ट सिटी अंतर्गत ब्रेमेन चौक ते परिहार चौक हा रस्ता विकसित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर ८ ते १५ ऑक्टोबपर्यंत या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्या अंतर्गत वॉकिंग प्लाझा, सायकल मार्गही करण्यात आले होते. एक आठवडा हा प्रयोग राबविल्यानंतर शनिवारी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ब्रेमेन चौक परिसरात जाऊन या प्रयोगाचा आढावा घेतला. त्या वेळी स्थानिक नागरिकांनी अनेक हरकती घेत या प्रयोगाला विरोध दर्शविला. आयुक्तांनी स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन प्रयोग राबविण्याअगोदर स्थानिक नागरिकांशी चर्चा करायला हवी होती, असे सांगत हा प्रयोग थांबवण्यात येत असल्याचे सांगितले.

आयुक्त कुणाल कुमार प्रयोगाचा आढावा घेण्यासाठी आले असता या वेळी स्थानिक नागरिक हर्षकुमार बंब, रवी ओसवाल, अ‍ॅड. मुसळे, साठे यांच्यासह अनेक नागरिकांनी ही योजना अयोग्य असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

ब्रेमेन चौक ते परिहार चौक या रस्त्यावर एका बाजूलाच पार्किंग करण्यात आले होते. तसेच वॉकिंग प्लाझा आणि सायकल मार्ग प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आले होते. हा रस्ता पाचशे मीटर लांब व चोवीस मीटर रुंद आहे. मात्र महापालिकेच्या प्रयोगामुळे केवळ साडेचार मीटर रस्ता वाहतुकीसाठी उरला होता. औंध, बाणेर, पाषाण, पिंपळे-सौदागर अशा नऊ रस्त्यांवर जाण्यासाठी हाच रस्ता असल्याने प्रयोगादरम्यान येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तसेच पर्यायी म्हणून देण्यात आलेला पोलिस वसाहतीचा रस्ता हा खासगी मालकीचा असून त्या रस्त्यावरून पोलिस वसाहत रस्त्यावर जाण्यासाठी जो मार्ग तयार करण्यात आला आहे, ती जागा खासगी मालकीची जागा आहे. त्यामुळे हा रस्ता कधीही बंद होऊ शकतो, हे आणि असे अनेक आक्षेप स्थानिक नागरिकांनी शनिवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना नोंदवले.

स्त्रोत : लोकसत्ता

 05
Advertisements