पावसाच्या कृपेने पुणे जिल्हाही पाणीदार!

सर्वच धरणांनी तळ गाठला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्यालाही मोठय़ा प्रमाणावर कात्री लावण्यात आली होती.

*  पंचवीसपैकी पंधरा धरणात १०० टक्के पाणी
* उपयुक्त पाणीसाठा २०० ‘टीएमसी’च्याही वर

मोसमी व परतीचा पाऊसही चांगलाच बरसल्याने धरणातील मोठय़ा प्रमाणावरील पाणीसाठय़ाने पुणे जिल्हाही पाणीदार झाला आहे. जिल्ह्यातील पंचवीस धरणांपैकी पंधरा धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा असून, सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा दोनशे टीएमसीच्याही (अब्ज घनफूट) पुढे गेला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमतेचे उजनी धरणही यंदा शंभर टक्के भरले आहे. मागील अनेक वर्षांमध्ये पाणीसाठय़ाबाबत प्रथमच चांगली स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मागील तीन-चार वर्षांमध्ये अपुरा पाऊस पडल्याने जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातही पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले होते. सर्वच धरणांनी तळ गाठला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्यालाही मोठय़ा प्रमाणावर कात्री लावण्यात आली होती. त्यातच यंदा जून महिनाही कोरडा गेल्याने पाण्याची चिंता चांगलीच वाढली होती. मात्र, जुलैच्या पहिल्याच दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. महिनाभरातच धरणातील पाणीसाठय़ात वाढ झाली. परतीचा पाऊसही चांगलाच कोसळला. त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यातील पंचवीस धरणांपैकी पंधरा धरणे शंभर टक्के भरली आहेत. वडज, डिंभे, घोड, काळमोडी, वडीवळे, आंद्रा, पवना, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर, उजनी या धरणांचा त्यात समावेश आहे. चासकमान, कासारसाई, मुळशी या तीन धरणांमध्ये ९८ टक्क्य़ांहून अधिक पाणीसाठा आहे.

पुण्याला पाणीपुरवठा होणारी खडकवासला धरणसाखळीतील वरसगाव व पानशेत ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. खडकवासला धरणात ९५. ५१ टक्के, तर टेमघर धरणात ७२ टक्के पाणीसाठा आहे. या चारही धरणांमध्ये सद्य:स्थितीला एकूण २८ टीएमसी पाणीसाठा आहे. पुण्याला दोन वेळ पाणीपुरवठा केल्यास महिन्याला दीड टीएमसी पाणी लागते. जिल्ह्य़ातील सर्व धरणांतील पाणीसाठय़ाची स्थिती पाहिल्यास एकूण पाणीसाठा २०८ टीएमसी आहे. त्यात सर्वाधिक ५३.५७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उजनी धरणात आहे. त्या खालोखाल भाटघर धरणामध्ये २३.५० टीएमसी पाणीसाठा आहे. उजनी धरणामध्ये मागील काही वर्षांत प्रथमच मोठा पाणीसाठा जमा झाला आहे.

स्त्रोत : लोकसत्ता

dam-3