पिण्याच्या पाण्याची वणवण थांबणार

पुणे कॅंटोन्मेंटमधील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्याच्या “पेयजल योजने‘तील तांत्रिक अडचण आता दूर झाली आहे. त्यामुळे लवकरच कॅंटोन्मेंटवासीयांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबण्याची शक्‍यता आहे. त्या दृष्टीने बोर्ड प्रशासनाने पावले उचलले आहेत.

कॅंटोन्मेंटवासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्याची घोषणा बोर्ड प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी केली होती. त्यास बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजीवकुमार व उपाध्यक्ष दिलीप गिरमकर यांच्यासह सर्व सदस्यांनी या योजनेला पाठिंबा दिला. तसेच ही योजना तत्काळ पूर्ण करण्याची मागणीही बोर्ड प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी “पिरामल सर्वजल‘ या संस्थेचे सहकार्यही प्रशासनाला मिळाले. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ही योजना मार्गी लागण्यास अडचणी येत होत्या. कॅंटोन्मेंटच्या विविध भागांतील उपलब्ध पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनविणे आणि ते कॅंटोन्मेंटवासीयांना देणे, असे या योजनेचे स्वरूप आहे. पाण्याचे नमुने तपासणी, विहिरी व कुपनलिकेजवळ आवश्‍यक यंत्रणा बसविणे आणि या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करणे, यांसारख्या अनेक तांत्रिक कारणांमुळे ही योजना राबविण्यात अडचणी येत होत्या.

“”पाण्याच्या तपासणीचे नमुने उपलब्ध झाले आहेत. निविदा प्रक्रियेत तीन कंपन्यांनी सहभाग घेतला होता. शनिवारी ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे कॅंटोन्मेंटवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न लवकरच सुटेल,‘‘ अशी माहिती कॅंटोन्मेंटच्या अभियंता विभागाने दिली आहे.

कॅंटोन्मेंटवासीयांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठीच पेयजल योजनेंतर्गत कॅंटोन्मेंटवासीयांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याच्या उपक्रमास आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला आहे. या उपक्रमासाठीची तांत्रिक अडचण दूर झाली आहे. सर्व यंत्रणा बसविल्यानंतर एका तासात शंभर लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.
– दिलीप गिरमकर, उपाध्यक्ष, पुणे कॅंटोन्मेंट

स्त्रोत : सकाळ