नवीन विमानतळाला रेल्वेचा मार्गही जवळ

पुरंदर तालुक्‍यातील नियोजित विमानतळाजवळून जाणाऱ्या रेल्वे मार्गांचेही लवकरच विस्तारीकरण होणार आहे. त्यामुळे राज्य महामार्गाबरोबरच विमानतळाकडे जाण्यासाठी रेल्वेचाही पर्याय उपलब्ध राहणार आहे. परिणामी, प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीसाठी या मार्गांचा भविष्यात उपयोग होईल.

पुरंदर तालुक्‍यातील पारगाव आणि परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राज्य सरकारकडून सर्वच पर्यायांचा विचार करून ही जागा निश्‍चित करण्यात आली आहे. सध्या पुणे-मिरज-सांगली या मार्गावरील रेल्वे पुरंदर तालुक्‍यातून जातात. सध्या हा मार्ग एकेरी आहे. पुणे- घोरपडी, हडपसर- फुरसुंगी मार्गे जेजुरी असा हा मार्ग आहे. नियोजित विमानतळासाठी निश्‍चित केलेल्या जागेच्या जवळून हा मार्ग जातो. हा मार्ग दुहेरी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

दुहेरी मार्गाचे सर्व्हेक्षणही पूर्ण
गेल्या वर्षीच्या (2014-15) अर्थसंकल्पात पुणे-मिरज-सांगली या मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडून तरतूद करण्यात आली होती. त्याचे सर्व्हेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच या मार्गाचे विद्युतीकरण आणि लोहमार्ग टाकण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सध्या धावणाऱ्या रेल्वेच्या संख्येतही वाढ होईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रेल्वे गाड्या वाढणार
सध्या सकाळी आणि संध्याकाळी या मार्गावर दोन पॅसेंजर आहेत. महालक्ष्मी, एर्नाकुलम यांसारख्या एक्‍स्प्रेस या मार्गाने जातात. हा मार्ग दुहेरी झाल्यानंतर त्यावरील सध्याच्या गाड्यांच्या फेऱ्या आणि नव्याने गाड्याही सुरू करण्याचे नियोजन आहे. पुणे-दौंड, पुणे-लोणावळा या प्रमाणे या मार्गावरही वेगवान लोकल, तसेच अन्य गाड्याही सुरू होऊ शकतात. या मार्गावरील वाहतूक वाढल्यास भविष्यात जेजुरी हेदेखील सबर्बन होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.

पुणे ते जेजुरी या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरी मार्ग करण्यास रेल्वे मंत्रालयाने गेल्याच वर्षी मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच ही दोन्ही कामे सुरू होणार आहेत. सध्या हा मार्ग एकेरी आहे. तो दुहेरी झाल्यावर या मार्गावरील वाहतूक वाढण्यास मदत होणार आहे.
– विकास देशपांडे, रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य
स्त्रोत : सकाळ