चिकुनगुनियाने पुणे फणफणले

राज्यातील 90 टक्के रुग्ण पुण्यात असल्याची नोंद
पुणे – चिकुनगुनियाच्या तापाने पुणे तापले असून, राज्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद शहरात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्यातील सुमारे 90 टक्के चिकुनगुनियाचे रुग्ण पुण्यात असल्याचेही आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

अरबो या विषाणूमुळे होणारा चिकुनगुनिया हा आजार एडिस इजिप्ती या डासाच्या माध्यातून पसरला जातो. स्वच्छ पाण्यावर हा डास अंडी घालतो. पुणे शहर आणि परिसरात पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. त्यातून चिकुनगुनियाचे प्रमाण शहरात वेगाने वाढत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

आरोग्य खात्याच्या सहसंचालिका डॉ. कांचन जगताप म्हणाल्या, ‘राज्यात चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड या परिसरात आहेत. राज्यात ऑगस्टपर्यंत चिकुनगुनियाच्या 439 रुग्णांची नोंद आरोग्य खात्यात झाली आहे. त्यापैकी 90 टक्के पुणे परिसरात आहेत.‘‘

शहरात जानेवारीपासून आत्तापर्यंत चिकुनगुनियाचे 397 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. त्यापैकी 78 रुग्णांची नोंद गेल्या 19 दिवसांमध्ये झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हे प्रमाण वेगाने वाढले असल्याचेही निरीक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी नोंदविले.

आकडे बोलतात…
दृष्टिक्षेपात चिकुनगुनिया
राज्यातील रुग्ण – 611 (ऑगस्ट अखेरपर्यंत)
पुण्यातील रुग्ण – 397
जिल्ह्यातील रुग्ण – 168
पिंपरी चिंचवड महापालिका – 14
(स्रोत – सार्वजनिक आरोग्य विभाग)

पुण्यातील चिकुनगुनिया
महिना …………. रुग्ण संख्या
एप्रिल ……….. 4
मे ……………. 21
जून ………….. 39
जुलै …………. 27
ऑगस्ट ………. 119
19 सप्टेंबरपर्यंत …… 78
(स्रोत – आरोग्य विभाग, पुणे महापालिका)

ही काळजी घ्या –
– घरातील पाणी साठविण्याची सर्व भांडी आठवड्यातून रिकामी करा
– पाणी साठविण्याची सर्व भांडी योग्य पद्धतीने झाकून ठेवा
– घराच्या भोवतालचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा
– निरुपयोगी व टाकाऊ वस्तू घराच्या छतावर आणि परिसरात ठेवू नका
– शक्‍यतो पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावेत

Advertisements