विकास आराखडय़ातील निवासी आरक्षणे रद्द करण्याची मागणी

शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखडय़ामध्ये विविध प्रकल्पांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या.

शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखडय़ात निवासी करण्यात आलेली ६७ निवासी आरक्षणे रद्द करावी आणि आरक्षणांच्या या जागा विकास प्रकल्पांसाठीच ठेवाव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे. या मागणीमुळे निवासी करण्यात आलेल्या आरक्षणांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखडय़ामध्ये विविध प्रकल्पांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या मुख्य सभेने ही आरक्षणे निवासी केली होती. या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस उज्ज्वल केसकर यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत बधे आणि माजी विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी यांनी आरक्षणांच्या या जागा निवासी न करता त्या विकासकामांसाठीच ठेवाव्यात अशी मागणी राज्याच्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. जुन्या हद्दीच्या विकास आराखडय़ाला मान्यता देताना महापालिकेने केलेला ठराव हाच मुळात बेकायदेशीर आहे, असा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे या ठरावाद्वारे मंजूर झालेल्या आराखडय़ाच्या वैधतेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

शहरातील विविध विकास प्रकल्पांसाठी राखून ठेवण्यात आलेली तब्बल २२ लाख चौरस फुटांची जागा निवासी करण्यात आली आहे. मात्र या जागा प्रकल्पांसाठीच आरक्षित राहणे आवश्यक आहे. त्याची शहराला गरज आहे. त्यामुळे विकासकामांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरील जी आरक्षणे निवासी करण्यात आली आहेत ती आरक्षणे रद्द करावीत, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. विविध प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी आरक्षणे आराखडय़ात पुनप्र्रस्थापित करणे आवश्यक आहे. तसे केल्यास विकासकामांसाठी जागा उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे आरक्षणे रद्द न करता ती पुन्हा दर्शवावीत, अशीही मागणी केली असल्याची माहिती केसकर यांनी दिली.

स्त्रोत : लोकसत्ता

building-4

Advertisements