कॅंटोन्मेंटमध्ये ‘नो हॉर्न’

कर्णकर्कश (ब्रास हॉर्न) हॉर्नपासून नागरिकांना वाचविण्यासाठी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाने संपूर्ण परिसर “नो हॉर्न झोन‘ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 15 ऑक्‍टोबरपासून याच्या अंमलबजावणीस प्रारंभ होईल. यापुढे हॉर्न वाजविण्यास “फॅशन‘ समजणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा निर्णय घेणारे पुणे कॅंटोन्मेंट हे देशातील एकमेव कॅंटोन्मेंट ठरण्याची शक्‍यता आहे.

शहर-उपनगरांमध्ये, विशेषतः चौक, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरामध्ये कर्णकर्कश हॉर्न वाजविण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. याची दखल घेऊन पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाने आपल्या हद्दीत “नो हॉर्न झोन‘ जाहीर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेतला. या निर्णयाला बोर्डाचे सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी तत्काळ मान्यता दिली. त्यामुळे आता कॅंटोन्मेंट हद्दीत हॉर्न वाजविण्याचा अतिरेक करणाऱ्यांवर कारवाई होईल.

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार म्हणाले, ‘वाहनचालकांकडून अनावश्‍यक आणि कर्णकर्कश पद्धतीने ठिकठिकाणी हॉर्न वाजविले जाते. त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप होतो. त्यामुळेच संपूर्ण कॅंटोन्मेंट परिसर “नो हॉर्न झोन‘ म्हणून आम्ही जाहीर केला आहे. यामुळे विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांवर नियंत्रण मिळविणे शक्‍य होईल. या प्रस्तावास बोर्डाने मंजुरी दिली आहे.‘‘

हॉर्न वाजविण्यात येणारी ठिकाणे
एम्प्रेस गार्डन, क्वीन्स गार्डन रस्ता, ईस्ट स्ट्रीट, महात्मा गांधी रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शंकरशेठ रस्ता, सोलापूर रस्ता, वानवडी, घोरपडी यांसह कॅंटोन्मेंटच्या हद्दीतील प्रमुख ठिकाणी कर्णकर्कश हॉर्न वाजविले जात आहेत. या सर्व ठिकाणांवर कॅंटोन्मेंट प्रशासनाचे लक्ष असणार आहे.

आदर्श हॉर्न कसा असावा?
वाहनांच्या क्षमतेनुसार संबंधित वाहन कंपन्यांकडून वाहनांना हॉर्न बसविले जातात. प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही (आरटीओ) वाहननोंदणी करताना याच हॉर्नला मान्यता मिळते. वायू व ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत नाही, अशाच हॉर्नला प्राधान्य द्यावे.

‘मॉडीफाय‘ हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषण
वाहन कंपन्यांनी बसविलेले हॉर्न काढून त्याऐवजी कर्णकर्कश हॉर्न (ब्रास हॉर्न) बसविण्याला तरुणाईची पसंती आहे. चारचाकी वाहनांचे हॉर्न दुचाकीला, विचित्र आवाज काढणारे हॉर्न किंवा एकदा हॉर्न वाजविल्यानंतरही तीन-चार वेळा आवाज निघणे, अशा स्वरूपाचे हॉर्न बसविले जात आहे. त्यामुळे मोटारवाहन अधिनियमांचे उल्लंघन होते, तसेच नवजात बालक, लहान मुले, वृद्धांसह नागरिकांना त्याचा त्रास होतो.

अशी होणार अंमलबजावणी
* वाहनचालकांवरील कारवाईसाठी वाहतूक पोलिसांची घेणार मदत
* कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांवर कॅंटोन्मेंट ठेवणार “वॉच‘
* सायलेंसरमधून फटाक्‍यांचे आवाज काढणाऱ्यांवरही कारवाई
* शाळा, रुग्णालयांसह लष्करी संस्थांच्या परिसरावर बारकाईने लक्ष
* आवश्‍यकतेनुसारच हॉर्न वाजविण्याची परवानगी

वायू व ध्वनिप्रदूषण
मोटार वाहन अधिनियमांतर्गत कलम 192 (2) नुसार वायू व ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी होणार वाहनचालकांवर कारवाई.

दंडाची रक्‍कम
सध्याची दंडाची रक्कम – पाचशे रुपये (चालक व मालक वेगवेगळे असतील, तर प्रत्येकी 500 रुपये दंड)

स्त्रोत : सकाळ

Advertisements