खड्डेच खड्डे चोहीकडे….

महापालिका प्रशासन बडवतेय दुरुस्ती केल्याचे ढोल..
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नेमलेले 25 पथके, फिरते रस्तेदुरुस्ती पथक आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) यंत्रणेच्या माध्यमातून खड्डे बुजविले जात असल्याचे ढोल महापालिका प्रशासनाकडून बडविण्यात येत असले तरी अनेक रस्त्यांवर अजूनही खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. पावसाने उघडीप दिली तरी खड्डे बुजविण्याचे काम होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहराच्या विविध भागांतील प्रमुख आणि जोड रस्त्यांची दुरवस्था असतानाही त्यांची दुरुस्ती केली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासन करीत आहे. परंतु, नेमके कोणत्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येत आहेत, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

शहरातील सुमारे 2 लाख 50 हजार चौरस मीटर रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे महापालिकेने केलेल्या पाहणीतून आढळून आले आहे. पावसाळा तोंडावर असतानाही या रस्त्यांची कामे करण्यात आली. विशेषत: डांबर टाकून रस्त्यांची डागडुजी करण्याचा सोपस्कर करण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यात खड्डे पडणार नसल्याचा दावा महापालिकेच्या पथ विभागाने केला. मात्र, गेल्या दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे याच रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यात वर्दळीच्या प्रमुख स्वारगेट परिसरासह पुणे सातारा रस्ता, शिवाजी रस्ता, गरवारे बालभवनसमोरील रस्त्यावर अनेक ठिकाणी अजूनही खड्डे आहेत. टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्त्यांवरही काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती करूनही खड्डे बुजविण्यात पथ विभागाला अपयश आले आहे.

नव्याने केलेल्या रस्त्यांवरील खड्डे संबंधित ठेकेदारांकडून बुजवून घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र, ऐन पावसात रस्त्यांवर डांबर टाकण्यात आल्याने ते वाहून गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रस्ते उखडलेले आहेत.

महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले, ‘खड्डे असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीची कामे सुरू आहेत. त्यासाठी नव्याने काही पथके नेमलेली आहेत. आवश्‍यक त्या रस्त्यांवर डांबराचा थर टाकला आहे. दुरवस्था झालेल्या नव्या रस्त्यांची कामे त्याच ठेकेदारांकडून करून घेण्यात आली आहेत. सर्व भागांतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येत आहेत. फिरत्या रस्तेदुरुस्ती पथकाची संख्या वाढविणार आहेत. शिवाय दैनंदिन कामासाठी नेमलेल्या पथकांच्या कामाचा अहवाल मागविला जात आहे.‘‘

कोट्यवधी रुपये खड्ड्यांत
शहरात अवघ्या तीन महिन्यांत रस्त्यांच्या डागडुजीवर तब्बल 15 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पावसाच्या तोंडावर ही कामे केल्यानेच कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे रस्त्यांवर जागोजागी खड्डे दिसत आहेत. अशा कामांची ठेकेदाराकडून हमी घेतली असली तरी त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. एकाच रस्त्यावर पुन्हा डांबर टाकून दुरुस्तीची “तत्परता‘ ही महापालिका प्रशासन दाखवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
— सकाळ वृत्तसेवा

Advertisements