कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी अन्‌ डासांचा प्रादुर्भाव

पिंपरी – रस्त्यांलगत कचऱ्याचे ढीग, पसरलेली दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव, बांधकामांचा राडारोडा असे टप्प्याटप्प्यावर दिसणारे चित्र आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपाला आलेल्या हिंजवडी गावात बघायला मिळते. मैलापाण्यापाठोपाठ “कचरा‘ ही हिंजवडीतील गंभीर समस्या. नव्हे, प्रत्यक्ष आयटी पार्क आणि हिंजवडी परिसरात हे चित्र मोठाच विरोधाभास दर्शविते. झपाट्याने वाढलेल्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीवर येणारा अतिरिक्त ताण आणि दुसरीकडे एमआयडीसीची कुचकामी यंत्रणा, यामुळे हिंजवडी गावठाणाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
कचऱ्याच्या ढिगामध्ये अन्नाचा शोध घेणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याने एका लहान मुलावर हल्ला केल्याची घटना आजही अनेकांच्या स्मरणात आहे. मात्र येथील बहुतांश हॉटेल्समधील कचरा अशाप्रकारे उघड्यावर टाकला जातो. अनेक ठिकाणचा कचरा महिनोन्‌महिने उचलला जात नसल्याने ढीग लागलेले पाहायला मिळतात. बहुतांश ठिकाणी कचरा इतस्ततः विखुरल्याचे दिसते. कचरा वेळेत न उचलला गेल्याने तो कुजून परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

राडारोडा रस्त्यावरच
माण- हिंजवडी रस्ता तसेच नदीकडे जाणाऱ्या “एमआयडीसी‘च्या भूखंडावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या भूखंडावरील बांधकाम रखडल्याने तेथे दलदलीचे स्वरूप आले आहे. येथील साचलेल्या दूषित पाण्यामुळे डासांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. एवढेच नव्हे, तर एमआयडीसीने टाकलेल्या “स्टॉर्म वॉटर‘ वाहिनीमध्ये चहाच्या कपांचा खच पाहायला मिळतो. “आयटी पार्क‘वर नजर ठेवून सुरू असलेल्या खासगी बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामांचा राडारोडा थेट रस्त्यांवर टाकण्यात धन्यता मानली आहे.

कुचकामी एमआयडीसी
हिंजवडी ग्रामपंचायतीचे सदस्य नागेश साखरे म्हणाले, “”कचरा संकलन आणि विल्हेवाट या कामी ग्रामपंचायत महिन्याला सहा लाख रुपये खर्च करते. औद्योगिक परिसरातील कचरा उचलण्यासाठी एमआयडीसीची स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र ही यंत्रणा कुचकामी असल्यानेच कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. या यंत्रणेमार्फत औद्योगिक परिसरातील कचरा संकलित करून तो गावाच्या वेशीवर नेऊन टाकला जातो. अनेकदा आम्ही त्याबाबत एमआयडीसीकडे लेखी तक्रारीही केल्या आहेत. मात्र त्यालाही केराची टोपली दाखविली जाते.‘‘
– सकाळ वृत्तसेवा

5534012143453032715_Org

Advertisements