स्वच्छता, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न बिकट

नवी पेठ, भारती भवनाचा परिसर, राजेंद्रनगर, दत्तवाडीचा निम्मा भाग, हनुमाननगर, पानमळा असा परिसर दत्तवाडी प्रभागात येतो. ३४ हजार मतदार असलेल्या या प्रभागात १७ हजार मते ही झोपडपट्टीधारकांची आहेत. एका बाजूला झोपडपट्टी, तर दुसऱ्या बाजूला सोसायट्या आणि पेठांचा परिसर. या प्रभागातील दांडेकर पुलाच्या परिसरात १२९, तसेच १३३ आणि ९९९ या तीन झोपडपट्ट्यांसह साथीआसरा वसाहत, दांडेकर पुलाजवळील १३०, हनुमाननगर, फाळके ओटा असा झोपडपट्ट्यांचा परिसर येतो. दत्तवाडी परिसरातील पूरग्रस्तांची घरेदेखील याच प्रभागात येतात. ९९९ या झोपडपट्टीचे गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाचे काम सुरू आहे. उर्वरित झोपडपट्ट्यांमधील रहिवासी अद्याप आश्‍वासनावरच टिकून आहेत. पूरग्रस्त वसाहतीमध्ये झालेले अतिक्रमण कायम करण्याचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित आहे. पायाभूत सुविधा काही प्रमाणात असल्या तरी सांडपाणी, कचरा यासह वाहतूक प्रश्‍न या प्रभागातील मुख्य आहे. ते सोडविण्याचा दृष्टीने म्हणावे तितके प्रयत्न झालेले नाहीत, अशी त्या प्रभागातील रहिवाशांची तक्रार आहे. राजेंद्रनगर येथील महापालिका वसाहतीचा डागडुजीचा प्रश्‍न कायम आहे. १००५ या झोपडपट्टीची पुनर्वसन योजना पूर्ण झाली. मात्र, तेथेही सुविधांचा अभाव असल्याचे भेट दिली असता दिसून आले.
झोपडपट्ट्यांमध्ये चालणारे अवैध धंदे तेथील रहिवाशांची डोकेदुखी ठरले आहेत. तक्रार करूनही पोलिसांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही किंबहुना त्यांना पोलिसांकडून संरक्षण दिले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रभागात एकाच आनंदीबाई गाडगीळ हा महापालिकेचा दवाखाना असून, तेथेही पुरेशा सुविधा नाहीत, अशी महिलांकडून तक्रार करण्यात आली. विकास आराखड्यात या प्रभागात आरक्षणे टाकण्यात आली आहेत. मात्र, ती विकसित करण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न नगरसेवकांकडून झाले नाहीत.

प्रभागात गेल्या साडेचार वर्षांत विविध ठिकाणी आठ समाज मंदिरे, दत्तवाडी येथे गणपती विसर्जनासाठी घाट, मदर तेरेसा व सचिन तेंडुलकर उद्यानात लहानांसाठी खेळणी व ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जिम बसविणे आदी कामे केली आहेत. प्रभाग कचरामुक्त करण्यासाठी घंटागाडी घेण्यात आल्या आहेत. तर ९९९ झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, लवकर त्यांना घरे मिळणार आहेत. अन्य झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू असून, पूरग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आनंदीबाई गाडगीळ दवाखान्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
– विनायक हनमघर, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

महापालिकेतील शहर सुधारणा समितीसह विविध समित्यांवर काम करण्याची संधी नगरसेवकाला मिळाली. परंतु, त्याचा लाभ आपल्या मतदारांना करून देता आला नाही. पूरग्रस्त, झोपडपट्टी पुनर्वसन, आरोग्य, स्वच्छता या प्रभागातील प्रश्‍नांबाबत गेल्या चार वर्षांत कोणतीही ठोस कामे झालेली नाहीत. प्रभागातून जाणाऱ्या अंबिल ओढ्याची गटारगंगा झाली आहे. राजेंद्रनगरमधील नागरिकांना मालकी हक्काची घरे, नवी पेठेतील वाड्यांची दुरुस्ती, असे अनेक प्रश्‍न कायम आहेत. केवळ आश्‍वासन देण्यापलीकडे मतदारांच्या हाती काही पडलेले नाही.
– महेश लडकत, भाजप

गेल्या साडेचार वर्षांत झोपडपट्टी परिसरातील दोन समाजमंदिर, दोन बौद्ध विहार बांधण्यात आली. ९९९ झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. उर्वरित झोपडपट्ट्यांमध्ये पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याशिवाय प्रभागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, कचरा वर्गीकरणासाठी आणि उचलण्यासाठी घंटागाड्या, सुलभ शौचालय, पथ दिवे आदी कामे केली. उलट आमच्या कामाबद्दल प्रभागातील कोणत्याही नागरिकांची तक्रार नाही.
-मनीषा बोडके, नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभागात दोन्ही नगरसेवकांचा संपर्क नाही. प्रभागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरणापलीकडे कोणतेही काम गेल्या साडेचार वर्षांत झालेले नाही. झोपडपट्टी, पूरग्रस्त वसाहत, महापालिका कर्मचाऱ्यांची वसाहत येथील रहिवाशांचे असंख्य प्रश्‍न आहेत. ते अद्यापही कायम आहेत. सांडपाणी, कचऱ्याचा प्रश्‍नदेखील मार्गी लागलेला नाही. राजेंद्रनगर येथील १००५ या ठिकाणी झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पाहिला, तर झोपडपट्टी बरी होती, अशी म्हणण्याची वेळ तेथील रहिवाशांवर आली आहे.
-शंकर पवार, काँग्रेस
– – सकाळ वृत्तसेवा

5680286734006015560_Org

Advertisements