“झाडे लावा, पाणी जिरवा’ संदेश देणार

देहू – “”यंदा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंड्या वारीत प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणार नाही. वारीतील दिंड्यांच्या वतीने गावोगावी “झाडे लावा, पाणी जिरवा‘ असा संदेश देणार आहेत. यंदाची “वारी स्वच्छ वारी, सुंदर वारी‘ करण्यासाठी संस्थान प्रयत्नशील आहे,‘‘ अशी माहिती संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख सुनील दा. मोरे, अशोक नि. मोरे यांनी सांगितले. पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याचेही मोरे यांनी सांगितले.

आषाढी वारीसाठी जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा 27 जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्‍वभूमीवर संत श्री तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी सुरू केली आहे. पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ, अब्दागिरी यांना पॉलिश करण्यात आले आहे. सोहळ्यात 330 दिंड्या सहभागी होणार आहेत. दिंडीप्रमुखांना संस्थानने पत्रव्यवहार केला आहे, असे संस्थानचे अध्यक्ष शांताराम महाराज मोरे यांनी सांगितले.

पालखी सोहळा प्रमुख सुनील महाराज मोरे म्हणाले, “”खडकीतील 512 डेपोमध्ये चांदीच्या रथाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. हायड्रालिक ब्रेक बसविण्यात आले आहेत. रथावर जीपीएस सिस्टिम बसविण्यात आली आहे. सीसीटीव्ही जनरेटर बसविण्यात आले आहेत. पालखी मार्गावर भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सरकारच्या पाणी, आरोग्य, वीज, रस्ते विभागाला पत्रव्यवहार केला आहे. पालकमंत्री आणि विभागीय आयुक्तांना पालखी मार्गावरील समस्यांबाबत माहिती दिली आहे. पालखी मार्गावर निवाऱ्यासाठी तंबूची व्यवस्था केली आहे. पालखी मार्गावरील अन्नदानासाठी लागणारे साहित्य खरेदी केले आहे. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा व पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यात आली आहे. मानकरी, सेवेकरी, दिंडी प्रमुखांना पत्रव्यवहार केला आहे. देऊळवाड्यातील स्वच्छतेसाठी 30 कर्मचारी नेमण्यात आले असून, सहा सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत. महाद्वारातून पालखी प्रस्थानच्या दिवशी दिंड्यांना प्रवेश देण्यात येणार असून, तपोनिधी नारायण महाराज प्रवेशद्वारातून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. देऊळवाड्यात सुरक्षेतील 16 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेले अब्दागिरी, गरुडटक्के इत्यादी साहित्याचे पॉलिश करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने दहा हजार गाथा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी मंदिरात 28 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

दिंडीकऱ्यांची वाहन तपासणी करणार
पिंपरी-चिंचवड आरटीओ विभागाकडून वारीतील दिंडीकऱ्यांच्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहेत. यात वाहनांचे ब्रेक, आईल तपासले जाणार आहेत. पीयूसी देण्यात येणार आहे. कोणताही अपघात होणार नाही, असे सुनील महाराज मोरे यांनी सांगितले.
– – सकाळ वृत्तसेवा

Advertisements