एक जुलैपासून वन महोत्सव

पावसाचे प्रमाण घटू लागल्याने राज्याला दरवर्षी दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्यभरात वृक्षारोपण करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून एक जुलै ते सात जुलै या काळात वन महोत्सव आयोजित केला आहे. या काळात प्रत्येक महाविद्यालयाने 50, तर शासकीय, मुक्त आणि अभिमत विद्यापीठांनी शंभर झाडांचे रोपण करायचे आहे.

पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यातील वन महोत्सवाचे नियोजन करण्यासाठी गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात प्राचार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमासाठी शहरी आणि ग्रामीण असे सहा नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. पुण्यासाठी डॉ. संजय खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैठकीत सहसंचालक डॉ. विजय नारखेडे, उप वनसंरक्षक सत्यजित गुजर, प्राचार्य आर. एस. झुंजारराव यांच्यासह अनेक प्राचार्य उपस्थित होते.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के वृक्षाच्छादन आवश्‍यक आहे. पण महाराष्ट्रात केवळ 20 टक्के वृक्षाच्छादन असल्याने वन महोत्सव आयोजित केला आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांनी वृक्षारोपण करून त्यांचे पालकत्व घ्यायचे आहे. ज्या महाविद्यालयांत वृक्ष
लावण्यासाठी जागा नाहीत, त्यांनी महाविद्यालयाच्या सभोवताली किंवा परिसरातील टेकड्यांवर वृक्षारोपण करायचे आहे, असे डॉ. नारखेडे यांनी सांगितले.
पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील 165 महाविद्यालये, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इतर अभिमत विद्यापीठांमध्ये वन महोत्सव होणार आहे. त्यासाठी सर्व ठिकाणी प्राचार्यांच्या बैठका झाल्या असून, वृक्षारोपणाचे नियोजन केले आहे. प्रत्येक महाविद्यालयाने शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य म्हणून या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. नारखेडे यांनी केले आहे.

जागेनुसार निवडा रोपे
आपल्या आवडीनुसार आणि उपलब्ध जागेनुसार वृक्षाची निवड करा. अशोक ही झाडे कमी जागेत लावता येतील. जागा मुबलक असल्यास मोठे वृक्ष लावावेत. त्यासाठी वड, पिंपळ, उंबर, चिंच यांची रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने महाविद्यालये, विद्यापीठांनी वृक्ष लागवड करून ती जगतील याची काळजी घ्यावी. त्यासाठी तणनाशके, जैविक खते वापरण्यात यावीत, असे उप वनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी सांगितले.
– – सकाळ वृत्तसेवा

Advertisements