अडीच हजार कचरावेचक बसून

संपूर्ण शहरातील कचरा हा वेचकांद्वारेच गोळा करण्याच्या महापालिकेच्या प्रक्रियेला काही नगरसेवकांच्या दबावाने खीळ बसते आहे. घंटागाडी पद्धत हद्दपार करून वेचकांमार्फत कचरा उचलण्याच्या पद्धतीने गाडी न आल्याने कचरा पडून राहण्याचा अनुभव पुणेकरांना येणार नाही. मात्र
वेचकांच्या शुल्काचे कारण सांगत अनेक माननीय आपल्या भागातील घंटागाड्या चालूच ठेवण्याचा दबाव आणत आहेत. त्यामुळे तब्बल अडीच हजार वेचकांची नेमणूक होऊनही त्यांना चक्क बसून राहावे लागते आहे. परिणामी, प्रशासन कितपत खंबीर राहते, यावर या योजनेचे यश अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी घरोघरी जाऊन कचरा गोळा करून त्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करण्याचा “स्वच्छ‘चा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने फेब्रुवारीमध्ये मंजूर केला. एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी अपेक्षित होती. कचरा गोळा करणाऱ्या वेचकांना झोपडपट्ट्यांतील घरांकडून वीस रुपये, सदनिकांत पन्नास आणि व्यावसायिक वापर करणाऱ्यांकडून शंभर रुपये दरमहा शुल्क मिळणार आहे. शहरात गेल्या दोन वर्षांपासून ठराविक भागात हा प्रयोग सुरू होता. आता तो शहरभर राबविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

शहराच्या काही भागांत माननीयांनी त्यांच्या तरतुदीतून घंटागाड्या घेतल्या आहेत. नागरिक त्यात मिश्र कचरा टाकत आहेत. तो कचरा थेट डेपोत जातो. तेथे त्याचे वर्गीकरण होते. त्यामुळे ज्या ठिकाणी घंटागाड्या सुरू आहेत, तेथे कचरा वेचकांना काम करता येत नाही. तसेच निवडणुकांमुळे काही भागात इच्छूक उमेदवारांनी मोफत कचरा गोळा करण्यासाठी वाहने पुरविली आहेत. तर मध्य भागात काही ठिकाणी नगरसेवक शुल्क आकारू देत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दहा लाख घरांपर्यंत पोचून कचरा गोळा करण्याचा उपक्रम कागदोपत्रीच राहण्याची चिन्हे आहेत.

शहरात सुमारे 250 घंटागाड्या आहेत. त्या गाड्यांमार्फत थेट नागरिकांकडून कचरा गोळा करू नये, असा आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गेल्या महिन्यात दिला होता; परंतु, काही प्रभागांत माननीयांच्या दबावामुळे त्या गाड्या सुरू आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी स्वच्छ काम करू शकत नाही. त्यामुळे सोसायट्यांतील कचरा उचलण्यासाठी स्वच्छने आता पुढे पाऊल टाकले आहे. सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास प्रत्येक सदनिकेपर्यंत पोचून किंवा सोसायटीच्या प्रवेशद्वारातून कचरा उचलण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्यांना पत्र पाठविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच नजीकच्या काळात घंटागाड्या बंद करण्याचे महापालिकेने ठरविले असून, कचरा गोळा करण्यासाठी नागरिकांनी शुल्क द्यावे, यासाठीही उपाययोजना आखल्या आहेत.

महापालिका म्हणते
सहआयुक्त सुरेश जगताप ः स्वच्छला संपूर्ण शहरातून कचरा गोळा करण्याची परवानगी दिली असली, तरी ज्या ठिकाणी त्यांचे कचरावेचक नाहीत, तेथे महापालिकेच्या घंटागाड्या सुरू ठेवाव्या लागतील. स्वच्छने तेथे योजना केल्यावर घंटागाड्यामार्फत गोळा झालेला कचरा डेपोवर पोचविला जाईल. तसेच कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी शेडही उपलब्ध करून दिल्या आहेत. घंटागाड्या एकाच वेळी बंद करता येणार नाही, तर स्वच्छचे वेचक शहरभर निर्माण झाल्यावर या बाबत कार्यवाही करता येईल.

कचरावेचकांना मिळते उत्पन्न
घरोघरी जाऊन कचरा गोळा केल्यावर नागरिकांकडून मिळणारे शुल्क थेट कचरावेचकांना मिळणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरणही ते करणार आहेत. सुका कचरा काही प्रमाणात विकला जातो. त्यामुळे शुल्क आणि विकल्या गेलेल्या कचऱ्यामुळे त्यामुळे दुर्बल घटक वर्गातील कचरावेचकांना उत्पन्नाचे साधन मिळणार असून, कचऱ्याची समस्याही सुटण्यासाठी मदत होणार आहे. त्यातून महापालिकेला वर्गीकरण केलेला कचरा उपलब्ध होणार आहे. सध्या चार लाख 15 हजार घरांतून वेचक कचरा गोळा करीत असून त्यांना दरमहा सरासरी दोन ते पंधरा हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहेत. या बाबत नागरिकांकडूनही सहकार्य मिळत आहे.

अडीच हजार वेचक बसून
शहरातील चार लाख 15 हजार घरांतून “स्वच्छ‘चे सुमारे 2600 वेचक कचरा गोळा करीत आहेत. शहरात सुमारे दहा लाख घरे आहेत. तेथवर पोचून वेचक कचरा गोळा करणार आहेत. त्यासाठी संस्थेने तयारी केली असून, आणखी तीन हजार कचरावेचकांची नियुक्तीही केली आहे. मात्र, त्यातील 500 वेचकच सध्या कार्यरत आहेत.

कचरा उचलण्याची हमी मिळणार
घंटागाड्यांत सध्या मिश्र कचरा टाकला जातो. तसेच नागरिकांना गाडीच्या वेळानुसार कचरा टाकण्यासाठी जावे लागते. वेळेत काही फरक पडल्यास कचरा साचून राहतो. परंतु, घराघरांतून आता कचरा गोळा होणार असल्यामुळे कचरा उचलला जाणार, याची हमी नागरिकांना मिळणार आहे. तसेच कचऱ्याचे वर्गीकरण होणार असल्यामुळे शहरातील कचऱ्याची समस्या कमी होऊ शकते.

पुण्यातील घरे — 10 लाख
वेचकांद्वारे कचरा उचलला जातो — 4.15 लाख घरे
सध्याच्या वेचकांची संख्या — 2600
जादा वेचकांची नियुक्ती — 3000
घंटागाड्या –250
– – सकाळ वृत्तसेवा

4711752252613056085_Org