पाणीटंचाईला पर्याय नैसर्गिक स्रोतांचा

मॉन्सूनचे आगमन होताच, राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली होती. पाऊस लांबणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केल्यानंतर आणखी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात आजघडीला जेमतेम दीड महिना पुरेल, इतकाच म्हणजे केवळ 2.15 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध राहिला आहे. अशा परिस्थितीत पुढील आठवडाभरात पावसाने हजेरी न लावल्यास पुणेकरांना आणखी पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. त्याबाबतचा निर्णय महापालिका आणि पाटबंधारे खात्याच्या बैठकीत होणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पाणीकपात करताना दुर्लक्षित राहिलेले नैसर्गिक स्रोत आता पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. तसे झाल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठी मदत मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यायला हवा.

शहरातील पेठांच्या भागात विशेषतः सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ आणि कसबा पेठेतील जुन्या वाड्यांमध्ये विहिरी आणि आड आहेत. शिवाय, अनेक ठिकाणी झरेही आहेत. तसेच शहर आणि उपनगरांमधील अनेक जुन्या मंदिरांमध्येही विहिरी आहेत. मुबलक पाणी असल्याने वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या विहिरी, आड आणि झऱ्यांची नक्कीच दुरवस्था झाली असावी. गेल्या काही काळात नव्याने रस्त्यांची उभारणी करताना काही भागांतील झरेही जमिनीखाली गाडले गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे असे नैसर्गिक स्रोत शोधून घेऊन ते ताब्यात घेतले पाहिजेत. ते पुनरुज्जीवित करण्याच्या दिशेने आता पावले उचललीच पाहिजेत. मात्र, शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढविण्याआधी त्याकडे लक्ष न दिल्यास नैसर्गिक स्रोतही आटण्याची भीती आहे. त्यामुळे ही बाब आता पुन्हा दुर्लक्षित राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

सन 1961 मध्ये पानशेत धरण फुटल्यानंतर त्यातील सर्व पाणी वाहून गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तेव्हा पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर झाला होता. धरणात पाणीच नसल्याने शहराची पाण्याची रोजची गरज कशी भागविणार, असा प्रश्‍न भेडसावत होता. त्या वेळी नैसर्गिक स्रोत म्हणजे जुन्या विहिरी, आड आणि झऱ्यांचे पाणी उपयुक्त ठरल्याचे सांगितले जाते. सध्याचा धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि रोजची पाण्याची गरज लक्षात घेता, आता पुन्हा नैसर्गिक स्रोतांचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे दिसून येते. हे नैसर्गिक स्रोत ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रशासन आणि संबंधित खात्यांनी पुढाकार घ्यायला हवा. त्या संदर्भात महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे खात्याच्या बैठकीत चर्चा झाली पाहिजे. त्यातून नैसर्गिक स्रोतांचे पुनरुज्जीवन झाल्यास काही प्रमाणात का होईना, पण पाण्याची गरज भागू शकेल.

– – सकाळ वृत्तसेवा

 

Advertisements