नागरिकांच्या समस्यांकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष

प्रभागातील उच्चभ्रूंच्या सोसायट्यांमधील रस्ते सिमेंटचे झाले असून, आसपासच्या परिसराचे सुशोभीकरणही करण्यात आले आहे. या रस्त्यांची उंची अधिक असल्याने पावसाळ्यात सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. तसेच कचऱ्याचा प्रश्‍न आ वासून उभा आहे. भाजीमंडईची सुविधाही अजून नागरिकांना मिळालेली नाही. लोकमान्य कॉलनी परिसरात अनधिकृतपणे बसलेल्या झोपडपट्टीचा मुख्य प्रश्‍न कायम आहे. या प्रश्‍नांकडे नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
प्रभागात काही ठिकाणी चकाचक रस्ते व दुतर्फा लावलेली झाडे व सुस्थितीतील पथदिवे दृष्टिपथात पडतात. त्यामुळे प्रभाग स्वच्छ व सुंदर दिसतो. परमहंसनगर येथील गल्ल्यांमध्ये “रेन वॉटर हार्वेस्टिंग‘ प्रकल्प राबविण्यात आला आहे. अंतर्गत रस्त्यांवर दुभाजक बसविण्यात आले आहेत. जीत ग्राउंड येथे जॉंगिंग ट्रॅक करण्यात आला असून, नागरिकांच्या सोयीसाठी “वाय-फाय‘ यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.

शास्त्रीनगर पोलिस चौकीजवळ लोकमान्य कॉलनी नावाने गेल्या वीस वर्षांपासून वसलेली झोपडपट्टी नजरेसमोर पडते. टेकडीवर वसलेल्या या झोपडपट्टीतील नागरिकांना रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे. नगरसेवकांनी लक्ष घालून झोपडपट्टी परिसरातच स्वच्छतागृह बांधून द्यावे, अशी रहिवाशांची मागणी आहे. या ठिकाणची घरे दाटीवाटीने बांधलेली आहेत. झोपडपट्टीतून फिरताना अरुंद पाऊलवाटेने जावे लागते. सार्वजनिक नळकोंडाळ्यांवर पाणी भरावे लागते. सांडपाण्याचा निचरा होण्याची सोय नाही. गटार नसल्याने उघड्यावरच मलमूत्राचे पाणी साचल्याचे दिसून आले. रात्रीच्या वेळी उघड्यावरच महिलांना नैसर्गिक विधीसाठी जावे लागत आहे. 1997, 2000 आणि 2004 मध्ये झोपडपट्टीला आग लागली होती. भविष्यात काही दुर्घटना घडली, तर तेथे अग्निशमन दलाची गाडीदेखील पोचू शकणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे. झोपडपट्टीत सहाशे ते सातशे कुटुंबे राहतात. एकाबाजूला झोपडपट्टी आणि दुसऱ्या बाजूला उच्चभ्रूंच्या सोसायट्या या प्रभागात पाहायला मिळतात.

चौदा गल्ल्यांमध्ये उच्चशिक्षित नागरिकांचे बंगले व गृहनिर्माण सोसायट्या आहेत. तेथील रस्ते उत्तम आहेत. काही भागात कचऱ्याची समस्या कायम आहे. पावसाळ्यात रस्त्यात पाणी तुंबते. कचऱ्याची समस्या कायम आहे. परिसरातील समस्यांकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

कंटेनरमुक्त प्रभाग म्हणून या प्रभागाचे नाव घेतले जाते. 95 टक्के पाण्याचा प्रश्‍न सोडविला आहे. सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल समोरील बाजूचेही सुशोभीकरण झाले असून, परमहंस नगरातील रस्ते सिमेंटचे बनविले आहेत. अण्णासाहेब पाटील शाळेतही सुधारणा करण्यात येत आहेत. लोकमान्य कॉलनी येथील झोपडपट्टी अनधिकृत आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 2000 पूर्वीच्या नागरिकांना झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत सहभागी करून घेता येईल.
– किशोर शिंदे, नगरसेवक, मनसे

भारतीनगर, शास्त्रीनगर, गादिया इस्टेट, गुजरात कॉलनी येथे सिमेंटचे रस्ते, पाण्याचे नळजोड तसेच सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. नागरिकांना अधिकाधिक चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुतार दवाखाना येथे सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. नागरिकांनी पूजा पार्क ते सागर कॉलनीपर्यंत असलेल्या नाल्यांमध्ये कोणी कचरा टाकू नये, यासाठी नाल्याच्या दोन्ही बाजूस भिंत बांधून त्यावर जाळ्या टाकण्यात येतील.
– जयश्री मारणे, नगरसेविका, मनसे

परिसरातील सर्वे नंबर 89-90 मधील झोपडपट्टीवासीयांना सार्वजनिक स्वच्छता गृहाची सुविधा अद्यापही उपलब्ध झाली नाही. शास्त्रीनगरमध्ये बेकायदा बांधकामे झाली असून, त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायम आहे. भाजी मंडईही सुरू होऊ शकलेली नाही.
— श्‍याम देशपांडे, शिवसेना

परमहंसनगरमध्ये सिमेंट कॉंक्रीटमुळे रस्त्यांची उंची वाढली. त्यामुळे पावसाचे पाणी सोसायट्यांमध्ये शिरण्याची शक्‍यता आहे. शास्त्रीनगरच्या मागील बाजूस स्मशानभूमीमध्ये नागरिकांना बसायला बाक नाहीत. येथील धुरामुळे आसपासच्या सोसायटीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उद्‌भवत आहे. कचऱ्याची समस्या गंभीर आहे.
– रश्‍मी कड, भाजप
– – सकाळ वृत्तसेवा

5453242340057103229_Org

Advertisements