तळेगाव झाले निर्मल शहर

शहरात वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकाम करणाऱ्या 20 लाभार्थ्यांना प्रत्येकी 22 हजारांप्रमाणे चार लाख 40 हजार रुपये निधीच्या धनादेशांचे वाटप मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्षा माया भेगडे उपस्थित होत्या. राज्य सरकारच्या स्वच्छता अभियानंतर्गत नगर परिषदेच्या वतीने शहर हगणदारीमुक्त करण्याचा निर्धार केला होता. त्या अनुषंगाने नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे आठ गट करण्यात आले. प्रत्येक गटांत चारप्रमाणे 32 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. उघड्यावर शौचाला जाऊ नये, यासाठी माहितीपत्रके वाटण्यात आली. विविध ठिकाणी फलक लावण्यात आले. रिक्षाद्वारेही जनजागृती करण्यात आली. नगराध्यक्षा माया भेगडे, उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, पक्षनेते बापूसाहेब भेगडे, आरोग्य समिती सभापती किशोर भेगडे आदींनी शौचाला उघड्यावर जाऊ नये, असे आवाहन केले. सुरवातीला उघड्यावर जाणाऱ्यांना समज देण्यात आली. त्यानंतर गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करण्यात आली. समज देऊनही ऐकत नसणाऱ्या तेरा जणांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात आला. जनजागृतीच्या अनुषंगाने शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धा घेतल्या. तळेगावचे पोलिस निरीक्षक वसंतराव बाबर व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य लाभल्याचे मुख्याधिकारी गावडे यांनी सांगितले.

अभियान कालावधीत 15 ठिकाणी कम्युनिटी टॉयलेट्‌सची व्यवस्था करण्यात आली होती. वैयक्तिक स्वच्छतागृह बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र स्वच्छता अभियान निधीतून 12 हजार रुपये व नगर परिषद निधीतून 10 हजार रुपये असे 22 हजार रुपये लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी नगर परिषदेमध्ये ओळखपत्र, हमीपत्र, जागेचा नगर परिषदेचा कर भरल्याची पावती जमा केल्यास संबंधितास शौचालय बांधून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मुख्याधिकारी गावडे यांनी सांगितले.
स्त्रोत : सकाळ