अभयारण्याला वाचविणार कोण?

येरवड्यात नदीजवळ असलेल्या डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्याची जबाबदारी घेण्यावरून वन विभाग आणि महापालिका यांच्याकडून सातत्याने टोलवाटोलवी केली जात आहे. परिणामी, स्थानिक रहिवाशांकडून बेसुमार वृक्षतोड होत असल्यामुळे तेथील जैवविविधता धोक्‍यात येण्याची चिन्हे आहेत. असे असतानादेखील प्रशासकीय यंत्रणेची डोळेझाक वृत्ती कायम आहे. या परिसराला वेळीच संरक्षण न दिल्यास हे अभयारण्य लयास जाण्याची शक्‍यता असून, याला जबाबदार कोणाला धरायचे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

या अभयारण्यासाठी वाडिया परिवाराने सुमारे 25-30 वर्षांपूर्वी सात हेक्‍टर जमीन दिली होती. इकॉलॉजिकल सोसायटीचे संस्थापक डॉ. प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने हे अभयारण्य उभारले होते. त्यासाठी वन विभागाकडे पुरेसा निधी नव्हता, म्हणून अभयारण्य विकसित करण्यासाठी महापालिकेकडून अर्थसाह्य घेण्यात आले होते. परंतु सध्या या दोन्ही विभागांकडून दुर्लक्ष झाल्याने अभयारण्याला “वाली‘ उरलेला नाही. अभयारण्याला संरक्षण मिळावे, तसेच बेसुमार वृक्षतोड थांबावी, यासाठी सामाजिक संस्थांनी वारंवार आवाज उठविला. माजी नगरसेविका सुलभा क्षीरसागर यांनी दीड वर्षापूर्वी माहिती अधिकारात अभयारण्याची सद्यःस्थिती जाणून घेतली होती. त्यानुसार 2009-10, 2010-11 या वर्षांत अभयारण्य विकसित करण्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद केली नसल्याचे दिसून आले. तर 2011-12 मध्ये 42.50 लाखांची तरतूद केली होती. मात्र निधीचा वापर झाला नसल्याचे निदर्शनास आले. काही महिन्यांपूर्वी खासदार वंदना चव्हाण यांनीही अभयारण्याला भेट दिली. त्या वेळी त्यांनी अभयारण्याला संरक्षण देण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या. मात्र त्यानंतरही परिस्थिती “जैसे थे‘च आहे.

खरंतर अभयारण्याची जबाबदारी स्वीकारण्यावरून महापालिका आणि वन विभागात एकमत होत नसल्याचे दिसते. या अभयारण्याची जागा वन विभागाच्या अखत्यारित आहे. मात्र सध्या या जागेचे वर्गीकरण महापालिकेत करण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळेच या जागेकडे दुर्लक्ष होत आहे. अभयारण्य विकसित करण्याबाबत कुठलेही अधिकृत आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे उद्यान विभागाला त्या जागेची जबाबदारी स्वीकारता येत नाही. परंतु या सर्व सरकारी कामकाजात तेथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याने आता जागरूक पुणेकरांनी त्याविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे.

स्त्रोत : सकाळ

full_15download.jpg (297×170)
Advertisements