अपघात रोखण्यासाठी सरसावली पीएमपी

पुणे : ब्रेक फेल, आॅईल गळती, अन्य तांत्रिक बिघाड तसेच बसचालकांच्या चुकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) सरसावले असून, विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच काही उपाययोजनांवर काम सुरू असून, त्या लवकरच प्रत्यक्षात आणल्या जातील.

पीएमपी बसच्या विविध अपघातांमध्ये ७ जणांचा बळी गेला आहे. तसेच काही किरकोळ अपघातांमध्ये जखमी झालेल्यांची संख्याही जास्त आहे. तसेच कात्रज बसस्थानकात झालेल्या अपघातामुळे पीएमपीने मार्गावर आणलेल्या जुन्या बसेसमुळे प्रशासनावर टीका झाली. जुन्या बसेसमुळेच अपघात होत असल्याची ओरड सध्या होत आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दुरुस्त केलेली प्रत्येक बस आरटीओच्या तपासणीनंतरच मार्गावर आणण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

अपघात रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना डॉ. परदेशी म्हणाले, प्रवाशांची धावपळ व गोंधळ रोखण्यासाठी कात्रज, स्वारगेट व मनपा बसस्थानकांवर स्पीकरद्वारे माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही दिवसांत इतर मुख्य स्थानकांवर ही सुविधा केली जाईल. सर्व चालकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बस आगारातून बाहेर पडण्यापूर्वीच ब्रेकसाठी एअरप्रेशर, हँडब्रेक तसेच अन्य प्राथमिक गोष्टी नीट असल्याची खात्री केली जाईल. चालकांवर नियंत्रणासाठी ‘चालक तपासणी पथक’ तयार करण्यात येईल. तिकीट तपासणिसाप्रमाणे हे पथक चालकांचे बसचालन कौशल्य, बसथांब्यावर थांबणे, बसचा वेग, ब्रेक, गिअरचा वापर या गोष्टींवर लक्ष ठेवेल. त्यानुसार चालकांचा स्वतंत्र अहवाल तयार करून संबंधितांना प्रशिक्षण किंवा इतर उपाययोजना केल्या जातील. दि. १९ ते २२ मार्च या कालावधीत सर्व बसेसची ब्रेक सिस्टीम तयार करण्यात आली आहे. त्यातील ५ बसमध्ये दोष आढळून आला असून, त्या मार्गावरून काढण्यात आल्या आहेत. सर्व बसेसची सर्व प्रकारची तपासणी करून घेणार आहे. गॅरेज व वर्कशॉप सुपरवायझर प्रत्येक बसची पडताळणी नोंद ठेवतील. चालकांच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार त्यांना रिफ्रेशर कोर्स दिला जाईल. सर्व बसना मागे रिफ्लेक्टर बसविण्यात येतील, असे डॉ. परदेशी यांनी सांगितले.

पुणे व पिंपरी चिंचवडमधील मोठ्या २० बसस्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘बस बे’ तयार केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांची मदत घेतली जाईल. बसस्थानकाभोवती बॅरिकेड्स लावून बस बे तयार केला जाईल. तसेच आसपासचे अतिक्रमणही हटविले जाईल. याबाबत वाहतूक उपायुक्तांशी चर्चा झाली असून, पुढील दोन आठवड्यांत कार्यवाही होईल, असे डॉ. श्रीकर परदेशी यांनी नमूद केले.

स्त्रोत : लोकमत

full_13download

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s