शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत रस्त्यावर होणाऱ्या “वाहतूक कोंडी‘त सुमारे दीडशे शाळांमधील विद्यार्थ्यांचा श्वास गुदमरत आहे. मात्र वाहनांच्या गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यांमधून विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या मार्ग काढून देण्यासाठी जवळपास 50 शाळांमध्ये विशेष प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात “सकाळ‘ने केलेल्या सर्वेक्षणातून हे निदर्शनास आले.
“सकाळ‘ने केलेल्या सर्वेक्षणानुसार चारशेपैकी जवळपास दीडशे शाळांच्या परिसरात शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असल्याचे दिसून आले. रहदारीच्या रस्त्यालगत असणाऱ्या शाळांच्या स्कूल बस, व्हॅन, रिक्षा यांना पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने ही वाहने रस्त्यावरच उभी राहतात. विद्यार्थ्यांची वाहनात बसण्याची गडबड, सायकल किंवा पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा, यामुळे रहदारीचा रस्ता काही काळ “पॅक‘ होऊन जातो. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे चित्र सर्वेक्षणातून समोर आले. गल्ली-बोळात असणाऱ्या शाळांचीही स्थिती फार काही वेगळी नाही.
शाळांभोवतीची “वाहतूक कोंडी‘ हा प्रश्न काही वर्षांपूर्वी मध्यवर्ती भागातील शाळांना अधिक प्रमाणात जाणवत होता. परंतु आता सदाशिव पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ याबरोबरच उपनगरांमधील शाळांच्या परिसरातही वाहतूक कोंडीच्या समस्येने डोके वर काढले आहे. मात्र विद्यार्थ्यांची ने-आण सुरक्षित व्हावी, यासाठी पन्नासहून अधिक शाळांमध्ये विशेष प्रयत्न केले जातात. शाळेतील क्रीडा शिक्षक, वरच्या वर्गातील विद्यार्थी आणि काही पालकांच्या मदतीने शाळा परिसरात वाहतुकीचे नियंत्रण करण्यात येत असल्याची माहिती काही मुख्याध्यापकांनी दिली, तर शाळांभोवती होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिस आणि ट्रॅफिक वॉडर्नचेही सहकार्य मिळावे, अशी मागणी काही मुख्याध्यापकांनी केली आहे.
* शाळेबाहेरील वाहतूक कोंडी अशी सोडवा :
– वरच्या वर्गातील विद्यार्थी, शिक्षक यांच्या समन्वयाने वाहतुकीवर नियंत्रण
– शाळा सुटल्यावर रांगेत विद्यार्थ्यांना बाहेर सोडावे
– प्रत्येक मजल्यावरील वर्ग क्रमाक्रमाने सोडण्यात यावेत
– विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना मैदानात पार्किंगसाठी जागा द्यावी
– एकाच परिसरात असणाऱ्या शाळांनी भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत अंतर ठेवावे
– काही पालकांनी स्वत:हून पुढाकार घेत विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करावी
– ट्रॅफिक पोलिस किंवा ट्रॅफिक वॉडर्नची मदत घ्यावी
* वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हे आवश्यक :
– शाळेच्या परिसरात “नो पार्किंग‘ झोन असावा
– बस स्टॉप शाळेपासून काही अंतरावर हवेत
– ट्रॅफिक पोलिस किंवा ट्रॅफिक वॉर्डनचे सहकार्य
– वाहतूक नियंत्रणाचे प्रशिक्षण विद्यार्थी, शिक्षक, पालकांना मिळावे
* शाळेसमोरचा रस्ता तुलनेने छोटा आहे. परिसरात दोन-तीन शाळा आणि महाविद्यालये असल्यामुळे भरपूर गर्दी असते. त्यामुळे शाळेच्या स्कूल बस रांगेत लावल्या जातात. शिक्षकांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना रांगेत बाहेर सोडले जाते. वाहतुकीचे नियंत्रण योग्यरित्या व्हावे यासाठी वाहनचालकांची वेळोवेळी बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या जातात. त्यामुळे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी पंधरा ते वीस मिनिटांत परिसर मोकळा होतो.
– संध्या भांगे, मुख्याध्यापिका, विजयमाला कदम कन्या प्रशाला, एरंडवणे
* परिसरात जवळपास पाच शाळा आहेत. तसेच शाळेबाहेरील आवारात रिक्षा स्टॅंड, स्टॉल्स असल्यामुळे प्रचंड गर्दी असते. वाहतूक कोंडीतून विद्यार्थ्यांना मार्ग काढून देण्यासाठी शिक्षक स्वत: शाळेबाहेर उभे असतात. विद्यार्थ्यांना रांगेत बाहेर सोडले जाते. रस्ता ओलांडण्यासाठीही शिक्षक मदत करतात. शाळेच्या परिसरात ट्रॅफिक वॉर्डन किंवा ट्रॅफिक पोलिस असावा, अशी मागणी वारंवार करण्यात येत असून अद्याप संबंधित प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
– मीनाक्षी पवार, मुख्याध्यापिका, महापालिका शाळा क्रमांक 100 बी, गाडीतळ
– – सकाळ वृत्तसेवा