नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी पूर्व भारतातील पश्चिम बंगालचा बहुतांशी भाग व्यापून बिहार आणि ओडिशाच्या पूर्व भागापर्यंतचा टप्पा गाठला आहे. अरबी समुद्रावरून वाटचालीस पोषक वातावरण असल्याने सोमवारपर्यंतच्या (ता. 20) दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सून वाऱ्यांनी शुक्रवारी बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग व्यापला आहे. आंध्र प्रदेशच्या संपूर्ण रायलसीमा भागात मजल मारत किनाऱ्याकडील भागात मॉन्सून दाखल झाला. पश्चिम बंगालचा संपूर्ण भाग मॉन्सूनने व्यापला. कारवार, गदग, कर्नूल, कलिंगपट्टण, कटक, जमशेदपूरपर्यंत मॉन्सूनचे वारे पोचल्याच्या हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले.
पश्चिम राजस्थान ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाच्या पट्टा तयार झाला आहे, तर दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशालगत हवेच्या वरच्या थरात चक्राकार वारे वाहत होते. कर्नाटक आणि केरळच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. मॉन्सूनच्या वाटचालीस आवश्यक वातावरणीय स्थिती तयार झाल्याने सोमवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
– – सकाळ वृत्तसेवा