पर्यावरण सुरक्षेसाठी 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर पर्यावरण विभागाने कठोर बंदी घातली आहे. या बंदीची अंमलबजावणी सोमवार पासूनच सुरू होणार असल्याची घोषणा पर्यावरणमंत्र्यांनी येथे केली. यापूर्वी राज्यात 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर बंदी होती. मात्र, त्याची अंमलबजावणी ठोसपणे होत नव्हती.
आज मंत्रालयातील आढावा बैठकीत राज्यात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांसह उत्पादकांवर पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. या नियमाला बगल देणाऱ्या दुकानदार आणि उत्पादकांना 1 ते 5 लाख रुपये दंड आणि पाच वर्षांचा कारावास अशा शिक्षेची तरतूद करण्याचाही निर्णय घेतला.
यापूर्वीही राज्यात प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, अशा पिशव्यांचे उत्पादन सर्रासपणे सुरू आहे. यामुळे, पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला असून, प्लॅस्टिक पिशव्यांची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे, या कठोर निर्णयाशिवाय पर्याय नसल्याचे पर्यावरणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी आणि कागदी पिशव्यांची निर्मिती करण्यावर भर देण्याचाही सरकारचा प्रयत्न राहणार आहे. महिला बचत गटांना अशा प्रकारच्या पिशव्या तयार करण्याचे आवाहन करण्यात येईल.
Source: sakal, 24′ Feb