मुंबई – पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती करण्यासाठी राज्य सरकारकडून आता अधिक कडक पावले उचलली जाणार आहेत. हेल्मेट न घालणाऱ्यांना दंडवसुलीबरोबरच कारवाई का केली जाऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस घरपोच बजावली जाणार आहे.
पुण्यातील मुख्य सिग्नल आणि रस्त्यांवर कॅमेरे लावले जाणार असून, हेल्मेट न घालणाऱ्यांबरोबर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची नोंद त्यांच्यामार्फत ठेवली जाणार आहे. त्याच दिवशी रेकॉर्डिंग तपासून वाहनाच्या नंबर प्लेटवरून उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहनचालकाच्या घरी नोटीस पाठवून दंड वसूल केला जाणार आहे. एकाच वाहनासाठी तीन ते चार वेळा नोटीस आल्यास चालकाचा परवाना रद्द करण्यासारख्या गंभीर कारवाईचाही विचार सुरू असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.
पुणे – मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रावते यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की द्रुतगती मार्गावरील वाढते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, वाहनचालकांमध्ये शिस्त लागावी म्हणून या मार्गावर वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश तपासणी पथकाला दिले होते. त्यानुसार 9 जून ते 17 जून 2016 या कालावधीत मुंबई- पुणे द्रुतगती मार्गासह मुंबई व पुणे शहरात प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे, पिंपरी- चिंचवड, पनवेल तसेच महामार्ग पोलिस, पुणे व ठाणे यांनी धडक वाहन तपासणी मोहीम राबविली.
या मोहिमेत महामार्ग पोलिस, ठाणे व पुणे यांनी केलेल्या वाहन तपासणीत 2168 वाहने दोषी आढळली असून, त्यांच्याकडून 3 लाख 78 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, पिंपरी- चिंचवड व पनवेल यांच्यामार्फत झालेल्या तपासणीत नियमभंग करणारी 2764 वाहने दोषी आढळली असून, त्यांच्याकडून 30 लाख 36 हजार 820 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, तर 34 वाहने जप्त करण्यात आल्याची माहितीही रावते यांनी दिली.
तपासणी मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पिंपरी- चिंचवड आणि पनवेल उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे वायुवेग पथकाच्या वाहनांवर व्हीडीओ कॅमेरे लावण्यात आले होते. त्यांतील माहितीच्या आधारे 1165 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, 750 वाहनमालकांना घरपोच नोटिसा देण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे शहरात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 39 हजार 885 दोषी चालकांवर कारवाई झाली असून, त्यांच्याकडून 5 लाख 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
– – सकाळ वृत्तसेवा