पावसाने जुलै महिन्याच्या अखेपर्यंत ओढ दिल्याने गेल्या वर्षी पुणे शहराचे धाबे दणाणले होते. केवळ आठ ते दहा दिवस पुरेल इतकेच पाणी धरणात शिल्लक होते, तीव्र टंचाईमुळे पहिल्यांदाच एक दिवसाआड पाणी पुरवले जात होते. पावसाचे आगमन आणखी लांबले असते तर आणखी अडचण झाली असती. अशी परिस्थिती उद्भवणारच नाही, हे ठामपणे सांगता येत नाही. कारण या वर्षी आपले पाण्याचे नियोजन १५ जुलैपर्यंतचेच आहे. पुणे महापालिकेने मे महिन्यापर्यंत जलप्रक्रिया प्रकल्प पूर्ण करून ते पाणी शेतीसाठी पुरवले नाही, तर या वेळीही टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
पुण्यात उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे पुण्याला पाणी पुरवणाऱ्या धरणांच्या पाणीसाठय़ाबाबत सर्वानाच उत्सुकता आहे. पुणे शहराला पानशेत, खडकवासला, वरसगाव आमि टेमघर या धरणांचे पाणी मिळते. त्यांची उपयुक्त साठय़ाची एकूण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. या वर्षी शुक्रवारी सकाळपर्यंत (१३ मार्च) या धरणांमध्ये एकूण १४.२८ टीएमसी म्हणजे सुमारे ४९ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षांशी तुलना करता ही साठा दोन टक्क्य़ांनी कमीच आहे.
पुणे पाटबंधारे सर्कलचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याला दर महिन्याला साधारणत: सव्वा टीएमसी इतके पाणी पुरवले जाते. संपूर्ण वर्षांला पुणे शहराला एकूण १६.३५ टीएमसी इतके पाणी दिले जाते. याशिवाय या धरणांचे पाणी ग्रामीण भागात शेतीसाठी पुरवले जाते. हा सारा हिशेब पाहता, पुण्यासाठी १५ जुलैपर्यंत आणखी सव्वापाच टीएमसी पाणी पुरवले जाईल. याशिवाय शेतीसाठी दोन आवर्तने आणि बाष्पीभवन यांचा विचार करता आता उपलब्ध असलेले पाणी काठावर पुरेल अशी स्थिती आहे. शेतीच्या एका आवर्तनासाठी सुमारे पावणेचार टीएमसी पाणी लागते. तसेच, सुमारे दीड टीएमसी पाणी बाष्पीभवनाद्वारे उडून जाईल. हे पाहता पुण्यात या वर्षीसुद्धा १५ जुलैच्या पुढे पाणी पुरवायचे असेल, तर काटकसर करावी लागेल किंवा इतर मार्गानी पाण्याची उपलब्धता वाढवावी लागेल.
पुणे महापालिकेच्या नियोजनानुसार, महत्त्वाकांक्षी जलप्रक्रिया प्रकल्प १ मे पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. तसे झाले तर पुण्यातून दर महिन्याला सुमारे अर्धा टीएमसी पाणी (वर्षांला एकूण साडेसहा टीएमसी) शेतीयोग्य करून ते शेतीसाठी पुरवता येईल. तसे झाले तर मे व जून महिन्याचे मिळून आणखी एक टीएमसी पाणी पुण्याला वापरण्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. मात्र, या प्रकल्पाला विलंब झाल्यास पुण्यात गेल्या वर्षांप्रमाणे पाणीटंचाई स्थिती उद्भवण्याचा धोका आहे. पुणे महापालिकेचा जलशुद्धीकरण प्रकल्पांचा आतापर्यंतचा इतिहास पाहता, हे प्रकल्प वेळेवर पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे या वेळी काय होते, याबाबत उत्सुकता आहे.
स्त्रोत : लोकसत्ता