icare4pune

कालव्याच्या स्वच्छतेबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी उदासीन

हडपसर : जुन्या मुळा-मुठा कालव्यात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांकडून कालव्यात कचरा टाकला जात आहे. अनधिकृत मिळकतीमधून मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडण्यात येत असल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्‍यात आले आहे. कालव्याच्याकडेला अतिक्रमणांत वाढ झाली आहे. त्याकडे पाटंबधारे विभाग व महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

कालव्यातील सांडपाणी आणि कचरा यामुळे डास, दुर्गंधी, माशांचे प्रमाण वाढले असून परिसरातील नागरिक आजारी पडत आहेत. पावसाळ्यात डेंगीचे रुग्ण कालव्याकडेच्या सोसायट्यांमध्ये अधिक आढळतात. त्यामुळे कालव्याची स्वच्छता ठेवणे आवश्‍यक आहे. सुमारे चार किलोमीटर अंतराचा हा कालवा हडपसर व ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून जातो. कालवा भूमिगत करून त्यावर रस्ता तयार करावा, कालव्याकडेची अतिक्रमणे हटवावीत व होणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई व्हावी, यासाठी परिसरातील नागरिकांनी पाटबंधारे विभागाकडे याबाबत अनेकदा पाठपुरावा केला. मात्र याकडे संबधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कालव्याकडेला दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत असून, या कालव्याला कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाल्याची तक्रार “सकाळ‘चे वाचक नितीन आरू यांनी केली आहे.

गोंधळेनगर आणि शंकरमठ येथे कालव्याकडेला महापालिकेच्या उद्यान विभागाने उद्याने विकसित केली आहेत. त्यामुळे अतिक्रमणांना या परिसरात लगाम बसला आहे. याच धर्तीवर कालव्याकडेला सर्वत्र वृक्षारोपण केल्यास सरकारी जागेवरील अतिक्रमणे थांबतील; तसेच पर्यावरणरक्षणाला मदत होऊ शकेल. मात्र पाटबंधारे विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे कालव्याकडेला बकालपणा वाढला आहे.
पाटबंधारे विभागाने स्वतःच्या मिळकतीची देखभाल ठेवणे गरजेचे आहे. याला महापालिका जबाबदार नाही. तरीदेखील नागरिकांच्या सोयीसाठी आम्ही वेळोवेळी कालव्याची स्वच्छता करतो. अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी पाटबंधारे विभागाला वेळोवेळी सहकार्य असते. कालव्यात डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी आम्ही कालव्यात गप्पी मासे सोडले असून, कालव्यावर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. मात्र नागरिकांनीदेखील कालव्यात कचरा न टाकून सहकार्य करणे अपेक्षित आहे.
– संजय गावडे, सहायक आयुक्त, हडपसर क्षेत्रीय कार्यालय

स्त्रोत : सकाळ

full_1706198.jpg

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top