कवडी हे पुणे सोलापूर रस्त्यावर पुण्यापासून साधारण १५ किमी दूर असे एक लहानसे गाव आहे. गावातून वाहणारी नदी नि त्यावरचा बंधारा ही अनेक प्रकारच्या पक्षांची आवडती जागा दिसते. स्थानिक आणि स्थलांतरित प्रकारातले विविध जातींचे पक्षी इथे पहाता येतात .
अनेक पक्षांचा वावर असला तरी कवडीची स्थिती अतिशय वेदनादायक आहे . पाण्यातून वाहत येणारी प्रचंड घाण , पाण्यावर तरंगणारी जलपर्णी, त्यावर पसरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या हे दृश्य मन अक्षरश: सुन्न करते. त्यातच अस्वच्छता फैलावण्याच्या कामात थर्माकोलची ताटे, कचरा टाकून या कामात आपला हातभार लावताना दिसतात. सध्या कवडीच्या बांधाच्या डाव्या बाजूला सगळीकडे प्रचंड कचरा पसरला आहे. इंजेक्शनच्या सुया , सीरिंज , प्लास्टिक पिशव्या , हेल्मेट , सोफा , थर्मोकोल , बाटल्या , चपला , बूट, कपडे इतकी विविधता या कचऱ्यामध्ये पाहायला मिळते आहे.
कवडीच्या बांधावर अडकलेला कचरा दूर करण्याची मोहीम सध्या ‘ टेल-अस ‘ आणि ‘ दरोडे जोग इको ग्रीन संस्था ‘ यांनी हाती घेतली आहे. यामध्ये अधिकाधिक निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे , असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एका पक्षीमित्राने ‘पिपिट’ पक्षाचा फोटो काढला , त्यामध्ये त्याच्या पायाला काही तरी रोग झालेला आढळून आले आहे. सर्व पक्षीप्रेमींनी एकत्र येउन हा प्रश्न सोडविण्यासाठी ‘ टेल-अस ‘ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपासून कवडी स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवातही झाली आहे. ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी बापट यांच्याशी ८०८७६८२३७६ या क्रमांकावर अथवा honorarywildlifewardenpune@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक अनुज खरे खरे यांनी केले आहे.