शहरातील नो-पार्किंगमध्ये लावलेली वाहने उचलण्यासाठी नेमलेल्या टेम्पो आणि क्रेन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) नोंदणी नसल्याचे आढळून आले आहे. या वाहनांची नोंदणी नसताना देखील या टेम्पो, क्रेनचा वापर करून वाहने कशी काय उचलली जातात आणि त्यांच्यावर आरटीओकडून कारवाई कशी काय केली जात नाही, असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर इतरांसाठी नियमांवर बोट ठेवणारे आणि नियम मोडल्यास दंड वसूल करणारे वाहतूक पोलीसच नियमांचा भंग करत असल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ही बाब माहीत असूनही आरटीओकडून याबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याने हा विभागही नियम मोडण्याच्या पोलिसांच्या कार्यात तितकाच सामील असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नो-पार्किंगमध्ये लावलेली वाहने उचलण्यासाठी १७ टेम्पो आणि ९ क्रेन वापरल्या जातात. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने करार करून या वाहनांवर हे काम सोपवले आहे. या टेम्पो आणि क्रेनची याची वाहतूक शाखेकडून मिळवण्यात आली. मात्र, माहितीच्या अधिकारात मिळवण्यात आलेल्या माहितीनुसार या वाहनांची नोंद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीमधील टेम्पो आणि क्रेनची नोंदणी कधी केली, याची माहिती लोकहित फाउंडेशनचे अध्यक्ष अझर खान यांनी आरटीओकडे मागितली होती. याची माहिती देताना दुचाकी वाहने उचलणाऱ्या १७ टेम्पोपैकी सात टेम्पोची माहिती आरटीओकडे नसल्याचे सांगितले आहे, तर सर्वच्या सर्व नऊ क्रेनची ही नोंदणीची माहिती मिळत नसल्याची माहिती आरटीओकडून खान यांना देण्यात आली आहे. या एकूण २६ वाहनांपैकी केवळ १० टेम्पोंच्या नोंदणीची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणी नसलेल्या टेम्पोवर आरटीओकडून का कारवाई केली जात नाही, असा प्रश्न खान यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, नो-पार्किंगमधील वाहने उचलणाऱ्या टेम्पोसोबत करार करताना आरटीओने अनेक नियम घालून दिलेले आहे. मात्र, त्यातील अनेक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये या टेम्पोवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नीटनेटक्या व निळ्या रंगाच्या स्वच्छ गणशेवात हजर राहावे, त्या गणवेशावर ‘ऑन पोलीस डय़ुटी’ अशी अक्षरे लिहिलेली असावीत, त्या कर्मचाऱ्यांचे केस व्यवस्थित कापलेले असावेत, त्यांचे वय अठरापेक्षा जास्त असावे, या कर्मचाऱ्यांना टेम्पोच्या मालकाने ओळखपत्र पुरविणे आवश्यक आहे, त्या ओळखपत्रावर प्रभारी पोलीस निरीक्षक, संबंधित वाहतूक अधिकारी यांची स्वाक्षरी असावी, मालकाने टेम्पोसोबत स्वखर्चाने मोठय़ा आकाराची विजेची बॅटरी ठेवणे आवश्यक आहे अशी नियमावली घालण्यात आली आहे. मात्र, यातील बहुतांश नियम टेम्पो आणि क्रेन मालकांकडून धुडकावले जात आहेत. त्यामुळे पोलिसांच्या वाहतूक शाखेने देखील या वाहनांची माहिती न घेता त्यांची नेमणूक कशी केली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वाहनाचे नुकसान झाल्यास टेम्पो मालकाने द्यावी भरपाई
नो-पार्किंगमधील वाहन उचलताना वाहनाचे नुकसान झाल्यास त्याला टेम्पो मालक व क्रेन मालक जबाबदार राहतील. वाहन दुरुस्ती भरपाईचा सर्व खर्च टेम्पो मालकाला करावा लागेल, अशी स्पष्ट तरतूद करारात असताना देखील टेम्पो वरील कर्मचारी कशाही पद्धतीने वाहने उचलून टेम्पोमध्ये टाकतात. अनेक वेळा वाहनाचे नुकसान झाल्यानंतर वाहन चालकाचे म्हणणेसुद्धा हे कर्मचारी ऐकून घेत नाहीत. वाहन चालकाशी अत्यंत वाईट भाषेत बोलतात, असा नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्याचीही दखल पोलिसांकडून घेतली जात नाही.
स्त्रोत : लोकसत्ता