आळंदी – दिंडीकऱ्यांची वाहने वगळता मरकळ, चाकण, भोसरी औद्योगिक भागातून आळंदीला येणारी जड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव यात्राकाळात ड्रोनद्वारे चित्रीकरणास बंदी घालण्यात आल्याची माहिती आळंदीतील सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली.
गायकवाड यांनी सांगितले, की पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी येतात. या वेळी अपघातासारख्या घटना घडू नयेत, यासाठी आळंदीतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मरकळ, भोसरी आणि चाकण या औद्योगिक भागातून येणारी अवजड वाहतूक येत्या शुक्रवारपासून पूर्णपणे बंद केली जाणार आहे. पालखी प्रस्थानाच्या दिवशी (ता. 28) आळंदीत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. आळंदीत रस्त्यावर तसेच धर्मशाळांच्या बाहेर वाहने न लावता ती धर्मशाळेच्या आतील भागात लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रदक्षिणा रस्त्यावर वाहने उभी केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. यात्रा काळासाठी 75 पोलिस अधिकारी, साडेसहाशे पोलिस आणि सहाशे होमगार्ड नेमण्यात येणार आहेत. तसेच इंद्रायणी घाट, प्रदक्षिणा रस्ता, मंदिर परिसर, वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसाठी स्वतंत्र शंभर पोलिस मित्र नेमण्यात येणार आहेत. इंद्रायणी घाटावर भाविकांचे कपडे; तसेच पैशांच्या होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी साध्या वेशात पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी तसेच मंदिर परिसरात यात्रा काळात “ड्रोन‘द्वारे चित्रीकरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशाद्वारे बंदी घातल्याने “ड्रोन‘ वापरावर कारवाई केली जाईल. मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल. मंदिर आणि भाविकांच्या सुरक्षेचा विचार करता कमीत कमी लोकांना प्रवेश दिला जाईल. याबाबत वारकरी आणि आळंदीकर ग्रामस्थांच्या बैठकाही घेण्यात येणार आहेत.
दिघी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी सांगितले, की सोमवारपासून पुणे भागातून आळंदीत जाणारी जड वाहतूक बंद ठेवली जाईल. प्रस्थानाच्या दिवशी दुपारनंतर पुणे, भोसरी आणि मोशीमार्गे आळंदीला वाहने जाऊ दिली जाणार नाहीत. माउलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होत असताना पहाटेपासून पुण्याला येणारी; तसेच आळंदीला जाणारी वाहतूक रोखली जाईल. भोसरी फाटा आणि मोशी फाटा येथे ही वाहतूक अडविण्यात येणार असून, वारकरी आणि पालखी विश्रांतवाडीपासून पुण्याकडे मार्गस्थ झाल्यावर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात येईल. दिंडीकऱ्यांची वाहने लोणीकंद, येरवडामार्गे दुपारच्या विसाव्याला फुलेनगरमध्ये थांबतील. चुकलेल्या भाविकांच्या मदतीसाठी स्वतंत्रपणे देहूफाटा, दिघी, भोसरी फाटा, येरवडा या ठिकाणी मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
पुणे-आळंदी रस्त्यावर साठ पोलिस अधिकारी, पाचशे पोलिस असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. माउलींचा पालखी सोहळा आळंदीतून पुढे पुण्याकडे येत असताना ठिकठिकाणी स्वागत कमानी आणि कर्णकर्कश आवाजात ध्वनिक्षेपक लावले जातात. त्यामुळे भजनात व्यत्यय येत असल्याच्या दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या तक्रारी आहेत. यामुळे स्वागत कमानी रस्त्यापासून दहा फूट आत उभाराव्यात. तसेच ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी ठेवावा, असे आवाहन घोगरे यांनी केले.
– – सकाळ वृत्तसेवा