कात्रज बसस्थानकात झालेल्या बस अपघातात दोघांचा बळी गेला होता. त्यानंतर पीएमपीने केलेल्या पाहणीत हा अपघात मानवी चुकीमुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. बसस्थानकाची भौगोलिक स्थितीही त्यास कारणीभूत असल्याचे पाहणीनंतर निदर्शनास आले. याचा उल्लेख करून डॉ. परदेशी म्हणाले, की कात्रज बसस्थानकासमोर उतार असल्याने दुर्दैवाने ब्रेक निकामी झाल्यास ती बस थेट उताराने खाली येऊ शकते. त्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही वरिष्ठ चालक तेथील बस वाहतुकीवर लक्ष देण्यासाठी नेमण्यात आले आहेत. आठवडाभरात वर्तुळाकार पद्धतीने बस पुढे जातील, जेणेकरून उताराच्या दिशेने त्या उभ्या राहणार नाहीत. तसेच बसस्थानकाच्या मागे असलेल्या जागेची महापालिकेकडे मागणी केली जाणार आहे. याअनुषंगाने पुणे व पिंपरी चिंचवडमधील सर्व १० आगार व प्रमुख १२ बसस्थानकांचे येत्या सोमवारपासून सेफ्टी आॅडिट केले जाणार आहे. त्यासाठी वर्कशॉप सल्लागारांच्या नेतृत्वाखाली तीन जणांची टीम नेमण्यात आली आहे. ही टीम सर्व आगार व १२ बसस्थानकांची पाहणी करेल. त्यांच्या भौगोलिक रचना, प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, त्यांची सुरक्षितता, बसवाहतूक अशा विविध बाबींचा अभ्यास केला जाईल. त्याचा अहवाल तयार करून त्यानुसार प्रत्यक्ष उपाययोजना केल्या जातील, असे डॉ. परदेशी यांनी स्पष्ट केले.
… तर जूनपर्यंत
धावेल बीआरटी
नगर रस्ता, विश्रांतवाडी – आळंदी आणि औंध – रावेत या मार्गांवर बीआरटी प्रस्तावित आहे. या तीनही मार्गांवर आयटीएमएस सिस्टीम कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सिस्टीम सुरू केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने या मार्गावर पालिकेला उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जूनपर्यंत बीआरटी सुरू होईल, अशी अपेक्षा असल्याचे डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले.
स्त्रोत : लोकमत