icare4pune

अतिक्रमणांमुळे कोंडी

वर्दळीच्या लक्ष्मी रस्त्यासह कुमठेकर रस्ता आणि अप्पा बळवंत चौकाचा परिसर अतिक्रमणांनी व्यापत असल्याने या भागातील वाहतूक कोंडी वाढत आहे. शालेय साहित्यांच्या खरेदीमुळे अप्पा बळवंत चौक आणि परिसरात गर्दी होत असतानाच, बेकायदा स्टॉल हेच वाहतूक कोंडीला कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, पादचारी आणि वाहनचालक त्रस्त असून, त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शालेय साहित्यांच्या खरेदीसाठी अप्पा बळवंत चौकासह आजूबाजूच्या परिसरात नागरिकांची गर्दी होत आहे. लक्ष्मी रस्ता आणि कुमठेकर रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेऊन या भागातील रस्त्यांवर विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या स्टॉलची संख्या वाढली असून, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळेच परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत. परिणामी, या रस्त्यांवर रोज सकाळ आणि सायंकाळी वाहतूक विस्कळीत होते. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येत नसल्याचे दिसून येत आहे. खरेदीसाठी येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना जीव मुठीत घेऊन रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे.

महापालिकेची मोहीम थंडावली
शहरातील प्रमुख 45 रस्ते आणि 153 चौकांमधील अतिक्रमणे काढण्याची मोहीम महापालिकेने काही दिवसांपूर्वी हाती घेतली होती. मात्र, ही मोहीम आता थंडावल्याने वर्दळीच्या भागांतील अतिक्रमणे वाढत आहेत. त्याचा परिणाम वाहनांना पुढे सरकण्यास फारसा वाव मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

या परिसरातील रत्यांवरील अतिक्रमणांमुळे वर्दळीचा बाजीराव रस्ता, गणेश रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि कुमठेकर रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचे आढळून आल्याने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोंडी होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातून शनिवारवाडा परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे.

कुमठेकर रस्त्यावरील हातगाड्या आणि स्टॉलची संख्या मोठी आहे. या रस्त्यावरील बिझीलॅंड इमारतीसमोर ही अतिक्रमणे झाली आहेत. त्यातच या रस्त्यावरून “पीएमपी‘सह विविध प्रकारच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यालगतच्या अतिक्रमणांमुळे मुख्यत: बसगाड्यांना अडथळा निमाण होतो. त्यामुळे या परिसरात वाहनांचा वेग कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

बाजारपेठा आणि त्यामुळे होणाऱ्या गर्दीच्या भागातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी बेकायदा पार्किंग होत असल्याचेही दिसून आल्याने पादचाऱ्यांची गैसोय होत असून, त्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांची एकत्र यायला हवे, मात्र, तसे होत नसल्याने अतिक्रमणे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या विविध रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. बाजारपेठा असलेल्या भागांतील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विशेषत: लक्ष्मी रस्ता आणि अप्पा बळवंत चौकातील सर्व अतिक्रमणे काढली जातील.
– विलास कानडे, प्रमुख, अतिक्रमण विभाग महापालिका

वर्दळीच्या भागांतील अतिक्रमणे प्राधान्याने काढण्यात येत आहेत. त्यासाठी परिसराची पाहणी करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी बेकायदा स्टॉल, पथारी आणि हातगाड्या आहेत त्या उचलण्यात येत आहेत.
– अरुण खिलारी, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय अधिकारी
– – सकाळ वृत्तसेवा

5522104233981919762_Org

Scroll to Top